breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

उपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची घोषणा; ‘राजधानी’सह विविध सुविधांचा शुभारंभ

मुंबई उपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केंद्र व राज्य शासनाच्यावतीने करण्यात येत आहे. यापूर्वी अशाप्रकारची गुंतवणूक कधीच झाली नाही. त्यामुळे विकासकामांना गती मिळत असून आताचे केंद्र व राज्य शासन म्हणजे डबल इंजिन असल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसला गोयल यांनी शनिवारी हिरवा झेंडा दाखविला. तसेच पश्चिम व मध्य रेल्वेवरील विविध सुविधांचेही उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी उद्घाटक म्हणून गोयल यांनी आपल्या भाषणात मुंबई रेल्वेसाठी मोठी गुंतवणूक केली जात असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी बोलताना गोयल यांनी याआधीच्या सरकारवर टीकाही केली. राज्याला व खास करून मुंबईला याआधीच्या सरकारने कधी प्राधान्य दिले नाही. २००९ ते २०१४ पर्यंत राज्यात एक हजार १७१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. आता हीच गुंतवणूक वाढून ४ हजार ३४५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. आता मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी तर ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यात एमयूटीपी-३ अंतर्गत १० हजार ९४७ कोटी आणि एमयूटीपी-३ ए अंतर्गत ५४ हजार ७७७ कोटी रुपयांचा समावेश असल्याचे गोयल म्हणाले. विद्युतीकरणाच्या कामांविषयी बोलताना मुंबई मंडळ हे १०० टक्के विद्युतीकरण असलेले पहिले मंडळ आहे. २०१३-१४ मध्ये ६०० किलोमीटर रेल्वे मार्गाचे आणि २०१७-१८ मध्ये ४ हजार २७ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण झाले. देशभरातील रेल्वेत डिझेलवर वर्षांला १३ ते १४ हजार कोटी रुपये खर्च होतात. विद्युतीकरणामुळे त्यात बचत होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

राजधानी गाडीच्या फेऱ्या वाढणार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हजरत निजामुद्दीन या गाडीचा शुभारंभ करण्यात आला. या मार्गावर धावणाऱ्या अन्य मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या तुलनेत या गाडीमुळे प्रवास वेळेत पाच तासांची बचत होईल. ही गाडी महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील प्रवाशांसाठी व्हाया इटारसी, दिल्ली, मुंबईसाठी सर्वात वेगवान गाडी आहे. याविषयी गोयल म्हणाले की, २७ वर्षांनी मुंबई मार्गावरून राजधानी गाडी चालवण्यात येत आहे. आठवडय़ातून दोन वेळा ही गाडी धावणार. त्याच्या फेऱ्या वाढवण्याचा विचार केला जात आहे. त्याचबरोबर राजधानी गाडीचा वेग कर्जत, कसारा घाटमाथ्यातून जातानाही कायम किंवा त्यापेक्षा जास्त राहावा यासाठी दोन्ही बाजूला इंजिन जोडण्यात येणार आहे. यामुळे थोडाफार वेग वाढेल. या इंजिनासह चाचणीही केली जाणार आहे. परिणामी पश्चिम व मध्य रेल्वेवरील कोणती राजधानी दिल्लीत वेळेत पोहोचणार यात स्पर्धा रंगणार असल्याचेही गोयल म्हणाले.

विविध सुविधांचे उद्घाटन आणि लोकार्पण

दिवा-पनवेल मेमू गाडी रोहापर्यंत, पुणे ते कर्जत गाडीचा पनवेलपर्यंत विस्तार यांचा शुभारंभ करण्यात आला. पेण ते रोहा विद्युतीकरण, पनवेल स्थानकात दोन सरकते जिने व स्थानक परिसरात सुधारणा, सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मुंबई सेन्ट्रल येथे १०० फूट उंच भारतीय ध्वज, बेलापूर, तळोजा, प्रभादेवी, माटुंगा रोड, गोरेगाव, विरार, मालाड स्थानकात २३ कोटी रुपये खर्चाचे पादचारी पूल, वांद्रे, अंधेरी, बोरिवली स्थानकातही लिफ्ट, पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांत ४० एटीव्हीएम यासह अन्य सुविधांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.

कार्यालयीन वेळा बदलण्याचा प्रस्ताव अडगळीत

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सुकर प्रवासासाठी मुंबईकरांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी केले. लोकल प्रवासात गर्दीचा सामना करावा लागत असल्याने कार्यालयीन वेळा बदलण्याचा प्रस्ताव होता. मात्र गेल्या चार वर्षांत त्यावर चर्चाच होत आहे. राज्य सरकारने हा प्रस्ताव मांडला असता त्याला विरोधही झाला. त्यामुळे लोकांनीच सुकर प्रवासासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे गोयल म्हणाले. त्यामुळे हा प्रस्ताव अडगळीतच सापडला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button