उद्धव ठाकरेंना रामाचे आशीर्वाद मिळतील : मुख्यमंत्री
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/Uddhav-and-CM-1.jpg)
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दिले आहे. शिवसेना आणि भाजपाचा हिंदुत्व हा एकमेव उद्देश असल्याने उद्धव ठाकरेंनी अयोध्याला जाणं चांगलंच आहे. राम मंदिर उभारणे हा राजकारणाचा विषय नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं अयोध्येला जाण हे युतीसाठी पोषक असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर त्यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंना रामाचे आशीर्वाद मिळतील असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे अयोध्येला गेले याचा आम्हाला आनंद आहे. राम मंदिर हा राजकीय विषय नाही. राम मंदिर झालं पाहिजे हे सर्व हिंदू बांधवांना वाटतं. प्रभू श्रीराम अवघ्या भारताचे अराध्या दैवत आहेत. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतल्याने त्यांना प्रभू श्री राम नक्कीच आशिर्वाद देतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
अयोध्येतील दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता हॉटेलवरुन मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा अदित्य ठाकरे यांच्यासह रामजन्मभूमीच्या दिशेने रवाना झाले होते. त्यानंतर साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सहपरिवार त्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. केवळ दहा मिनिटांच्या या कालावधीनंतर ते पुन्हा पंचवटी हॉटेलकडे रवाना झाले. या ठिकाणी शिवसेनेचे नेते उपस्थित आहेत. राम मंदिराच्या निर्माणाची मागणी घेऊन विश्व हिंदू परिषद आणि शिवसेनेने अयोध्येत दोन स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केले आहेत. यापार्श्वभूमीवर शहरातील वातावरण तणावपूर्ण असून येथे मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे शहराला छावणीचे स्वरुप आले आहे.