आम्हाला पाहण्यासाठी थोडी कळ सोसा!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/ranibagh.jpg)
राणीबागेतील प्राणी-पक्ष्यांची पर्यटकांना विनंती
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (राणीबाग) मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्राण्यांच्या पिंजऱ्यांच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. राणीबागेतील हे पिंजरे तोडण्यात आल्याने प्राण्यांना पाहायला येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होतो. पर्यटकांना सुरू असलेल्या कामांची माहिती व्हावी याकरिता प्रत्येक पिंजऱ्याच्या बांधकामाच्या ठिकाणी प्राणी आणि पक्ष्यांच्या छायाचित्रांसह फलक लावत ‘आम्हाला पाहण्यासाठी थोडी कळ सोसा’ असा संदेश देत पर्यटकांची उत्सुकता वाढवण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जात आहे.
प्राणिसंग्रहालयातील वाघ, सिंह, सांबर, हरिण, नीलगाय, चार शिंगी हरिण, काळवीट, बार्किंग हरिण (भेकर) तसेच पक्ष्यांकरिता प्रदर्शनी बांधकाम सुरू आहे. सुमारे ६९ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. या पिंजऱ्यांमध्ये प्राण्यांचे रात्रीचे निवासस्थान बांधणे, प्राण्यांसाठी कसरतीचे आवार बांधणे, प्राणी पाहण्यासाठी गॅलरी बांधणे, प्रदर्शनी गॅलरीसाठी अॅक्रॅलिक ग्लासचे बांधकाम करणे, प्राण्यांसाठी कृत्रिम जलाशय बांधणे, तारांपासून तयार केलेल्या दोरखंडाच्या जाळीचा पक्षी ठेवण्यासाठी पिंजरा बांधणे, लँडस्केपिंग करणे, प्राण्यांच्या राखणदारासाठी खोली बांधणे आदी प्रकारची कामे या पिंजऱ्याच्या बांधकामांमध्ये समाविष्ट आहेत. पिंजऱ्यांचे तोडकाम झाले असून बांधकामाला सुरुवात होईल. तोडलेल्या पिंजऱ्याच्या जागेत पत्र्यांचे कुंपण घालण्यात आले होते; परंतु त्या ठिकाणी बांधकाम सुरू असल्याचे फलक लावण्यात आले होते.
या आकर्षक फलकांवर पक्षी व प्राण्यांची छायाचित्रे लावून आकर्षक संदेशही देण्यात आला आहे. एका छायाचित्राखाली ‘मला पाहण्यासाठी थोडी कळ सोसा’ असा संदेश देण्यात आला आहे. याशिवाय प्रत्येक फलकांवर ‘हा गेलो नि आलो’, ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’, ‘सुंदर मी होणार’, ‘धरून बसलोय दबा, तुम्ही पाहातच राहा’, ‘काय बिशाद माझ्या पकडीतून सुटाल’ अशा गमतीशीर ओळी लिहिल्या आहेत. यामुळे कुठल्या पिंजऱ्यात कुठला प्राणी वा पक्षी असेल, याची कल्पना पर्यटकांना येते. उद्यान कर्मचारी गौतम डांगे यांच्या संकल्पनेतून हे आकर्षक फलक लावण्यात आले आहेत.
पिंजऱ्यांचे बांधकाम सुरू असल्याने राणीबागेत येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होऊ शकतो. येथे होणाऱ्या विकासकामांची त्यांना कल्पना यावी म्हणून हे फलक लावले आहेत.
– आबासाहेब जऱ्हाड, अतिरिक्त आयुक्त