आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाने चांगभलं!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/disaster-.jpg)
अधिकारी पद दिवसभर वाऱ्यावर : विद्यमान परदेशवारीवर
पदभार कोणाकडेच दिला नसल्याने चर्चांना ऊत
पुणे – राज्यभरात पावसाने थैमान घातले असताना, गेल्या तीन दिवसांपासून पुण्यातही मुसळाधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक दुर्घटना घडत असतानाच; महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची जबाबदारीच कोणाकडे नसल्याची धक्कादायक बाब मंगळवारी समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाला आपत्तींबद्दल किती गांभिर्य आहे, याचा प्रत्यय येत आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची जबाबदारी असलेले गणेश सोनुने हे चार दिवसांच्या परदेश दौऱ्यावर गेले असतानाही; त्यांचा पदभारच कोणाकडे देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत या पदाचा भार देण्यासाठी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाची धावपळ सुरू होती.
गेल्या काही दिवसांपासून शहरात दररोज पाऊस होत आहे. तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळाधार पाऊस सुरू असून धरणांमधे वेगाने पाणीसाठा वाढत आहे. अशा स्थितीत पावसामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेने 24 तास आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारण्याचे आदेश राज्यशासनानेही दिले आहेत. त्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला गणेश सोनुने हे पूर्णवेळ अधिकारी आहेत.
याशिवाय, सोनुने यांच्याकडे सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारीही देण्यात आलेली आहे. मात्र, आधीच सोनुने यांच्याकडे एक नव्हे तर तब्बल तीन वेगवेगळे पदभार देण्यात आले आहेत. त्यात वारजे-कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्तपद, वृक्ष अधिकारी अशा महत्वाच्या खात्यांची अतिरीक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आपत्ती कक्षाकडे डोकावण्यास त्यांना वेळेत मिळत नाही आणि नागरिकांनी मोबाइलवरून संपर्क साधल्यावरही ते उपलब्ध होत नाहीत, अशा तक्रारी नगरसेवक तसेच नागरिकांकडून करण्यात येत असतानाच; राज्यभर पावसाने आपत्तीजनक स्थिती निर्माण झालेली असताना, सोनुने हे 10 ते 12 जुलै या तीन दिवसांच्या प्रशासकीय दौऱ्यासाठी सिंगापूरला गेले आहेत. त्यामुळे महापालिकेस तुर्तास आपत्ती व्यवस्थापन अधिकारीच नसल्याचे समोर आले आहे.
पदभार देण्याचा पडला विसर
सोनुने यांचा दौर पूर्वनियोजित होता. त्याच प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीच्या निदर्शनासाठी मागील आठवड्यात ठेवण्यात आला होता. समितीने त्यावर काहीच निर्णय घेतला नाही. त्या ठरावात प्रत्यक्षात सोनुने परदेश दौऱ्यावर जाताना त्याचा पदभार इतर अधिकाऱ्याकडे देऊन त्याची माहिती देणे आवश्यक होते. मात्र, प्रशासनाची ही चूक लक्षात आल्याने प्रशासनाने आज सुधारित प्रस्ताव समितीसमोर ठेवला जाणार होता.
मात्र, समितीची बैठकच तहकूब झाली. या गडबडीत मंगळवारचा संपूर्ण दिवस गेला तरी, पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पद सोनुने परदेशात असल्याने रिक्तच होते. दरम्यान, संध्याकाळी सोनुने यांच्या परदेश दौऱ्याची बातमी “व्हायरल’ झाल्यानंतर प्रशासनाच्या लक्षात ही बाब आली आणि त्यानंतर अपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याचा पदभार देण्यासाठी प्रशासनाची रात्री उशिरापर्यंत धावपळ सुरू होती.