‘आपणच आहोत आपले रक्षक’
‘नका होऊ स्वतःचे भक्षक’, 14 एप्रिलपर्यंत जन संचारबंदी पाळू – रामदास आठवले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/A-Gallery_21-1.jpg)
मुंबई | महाईन्यूज
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या 14 एप्रिलपर्यंत जनता कर्फ्यु लावला आहे. कोरोना हा साथीचा रोग गर्दीतून अधिक पसरतो. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही. कोरोना या महामारी विरुद्ध लढण्याची ही वेळ आहे. त्यामुळे या वर्षी 14 एप्रिल रोजी येणारी भीम जयंती घरी थांबूनच साजरी करूया.
कोरोनाविरुद्धचा मुकाबला जिंकल्यानंतर 14 एप्रिलनंतर आपण भीम जयंती साजरी करूया; त्या आधी कोरोना विरुद्ध चे युद्ध जिंकण्याचा संकल्प करा; संयम ठेऊन घरीच थांबा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.
दरवर्षी आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी होते. यावर्षी मात्र सार्वजनिक कार्यक्रम साजरा करण्याची वेळ नाही. यंदा गुढी पडव्याच्याही शोभायात्रा रद्द झाल्या आहेत. सर्व सार्वजनीक कार्यक्रम रद्द करावेत आणि घरीच जनतेने राहून येत्या 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांचा जनता कर्फ्यु यशस्वी करावा, असे सांगत “आपणच आहोत आपले रक्षक”
“नका होऊ स्वतःचे भक्षक” असे काव्यात्मक आवाहन आठवले यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हातावर पोट असणाऱ्या कामगारांसाठी 1 हजार 70 लाख कोटींचे पॅकेज जाहीर करून गरिबांना नवी संजीवनी दिली आहे, असे सांगत भारत सरकारच्या या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे.
कोरोना महामारीमुळे हातावर पोट असणारे असंघटित कामगार; गोर-गरीब झोपडीवासीयांचे रोजंदारी मजुरांची आर्थिक स्थिती बिकट आहे. ज्यांनी कर्ज घेतले आहे, अशा लोकांचे मासिक हफ्ते भरण्यास बँकांनी मार्च आणि एप्रिल महिन्याची सूट द्यावी. दोन महिन्यांचे रेशन अन्नधान्य गरिबांना मोफत द्यावे. त्यासाठी केंद्र सरकारने मदत जाहीर केली आहे. आता खाजगी उद्योगपती, उद्योजकांनी सीएसआर फंडातून गरिबांना मदत करावी, असे आवाहन आठवले यांनी केले आहे.