आत्महत्या हा मराठा आरक्षणावरील एकमेव पर्याय नाही, या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा – खासदार संभाजीराजे
![If the government is not listening for reservation, then a different way - Chhatrapati Sambhaji Raje](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/03/2017-03-2727sambhajiraje_ns.jpg)
पुणे: बीड जिल्ह्यातील विवेक राहाडे या युवकाने नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने आत्महत्या केली आहे. मात्र, विवेकने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे.
अशातचं आता खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आत्महत्या हा मराठा आरक्षणावरील पर्याय नसल्याचं म्हणत युवकांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलेलं आहे. संभाजीराजे यांनी आपल्या ट्विटर हँडवरून यासंदर्भात एक पोस्ट केलेली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिलेली आहे. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. समाजासाठी बलीदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली!’