आता विद्यार्थ्यांना वेध प्रवेशाचे
- एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर
पुणे- अभियांत्रिकी, फार्मसी व कृषी अभ्यासक्रमाच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी आवश्यक असलेली एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर झाला. विद्यार्थ्यांनी ऑनलाईनद्वारे निकाल पाहता, आता विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाचे वेध लागले आहे. बारावी व एमएचटी-सीईटीच्या निकालानंतर आता अभियांत्रिकी, फार्मसी, बीकॉम, बीएस्ससी व बीएच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय अर्थात “डीटीई’मार्फत अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. ही प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे “डीटीई’ने स्पष्ट केले आहे. त्यासाठी डीटीईकडून अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांना अर्ज करावे लागेल. त्यात कागदपत्रांच्या तपासणीनंतर अंतिम गुणवत्ता प्रसिद्ध होईल. त्यानंतर गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला जातो. ही सर्व प्रक्रिया सीईटीच्या गुणांच्या आधारे होणार आहे, हे महत्त्वाचे आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी निकालानंतर शहरातील बहुतांश महाविद्यालयाने बीए, बीकॉम व बीएसस्सी प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जासाठी लिंक खुली केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर मेरिट लिस्ट लागेल. त्यानुसार महाविद्यालयाच्या वेळापत्रकानुसार प्रवेश निश्चित करावे लागतील.
सध्या निकाल व सीईटीच्या निकालाच्या गुणानंतर विद्यार्थी व कुटुंबीयांमध्ये कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यासाठी पालकही ऑनलाईन माहिती प्राप्त करीत आहेत. तसेच काही पालक शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तींकडून सल्ला घेत आहेत. सध्याचे महागडे शिक्षण विचार करता व गुणही चांगले मिळाले असली तरी आपल्या आर्थिक “बजेट’मध्ये बसणाऱ्या शाखेसाठी प्रवेश, असा विचार पालकांतून होत असल्याचे दिसून येत आहे.
सीईटी निकालात पुण्याचा अमेय दुसरा
एमएचटी-सीईटी निकालात सातारा रत्यावरील चाटे ज्युनिअर कॉलेजचा अमेय झरकर हा विद्यार्थी “पीसीएम’ या गटात 200 पैकी 191 गुण मिळवून राज्यात दुसरा येण्याचा बहुमान मिळविला आहे. या यशाबद्दल अमेयचे चाटे शिक्षण समूहाचे फुलचंद चाटे यांनी अभिनंदन केले.