आता एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींना उच्चशिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/PSX_20180402_200920.jpg)
मुंबई : एस.टी कर्मचाऱ्यांच्या मुलांना १२ वी नंतर उच्च शिक्षणासाठी सावित्रीबाई जोतिबा फुले शिष्यवृत्ती योजना महामंडळातर्फे सुरु करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एस.टी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली.
यासंबंधीचे परिपत्रक नुकतेच महामंडळाच्या कर्मचारी विभागामार्फत निर्गमित करण्यात आले आहे. याचा लाभ महामंडळाच्या सुमारे १ लाख ४ हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे.१२ वी नंतर केवळ पैशा अभावी एस. टी. कर्मचाऱ्यांच्या महाविद्यालयीन मुला-मुलींचे उच्चशिक्षण खंडित होऊ नये, या उद्देशाने रावते यांनी सावित्रीबाई जोतिबा फुले शिष्यवृत्ती योजनेची संकल्पना मांडली. या योजनेअंतर्गत एस. टी. कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मान्यताप्राप्त विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या शिक्षण संस्थेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर दरमहा ७५० रुपये इतकी रक्कम शैक्षणिक शिष्यवृत्ती म्हणून मिळणार आहे. ही रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या राष्ट्रीयकृत,शेड्युल्ड बँकेच्या खात्यावर महामंडळातर्फे थेट जमा करण्यात येईल. दरवर्षी कामगार अधिकारी हे शिष्यवृत्ती पात्र पाल्यांची नावे मागवतील. त्यांची छाननी करून लाभार्थी पाल्यांच्या बँक खात्यावर दरमहा ही रक्कम जमा करण्यात येईल. प्रत्येक एस.टी. कर्मचाऱ्यांच्या दोन पाल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती मंत्री रावते यांनी दिली.