आण्णांच्या उपोषणाला मोदींच्या शुभेच्छा; उपोषणाला कोणी शुभेच्छा देते का? अजितदादांचा सवाल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/ajit-pawar.jpg)
पुणे – भाजप सरकारचा उद्दामपणा, मग्रूरी, मस्ती इतकी वाढली आहे की समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. अरे उपोषणाला कोण शुभेच्छा देतो का? अण्णा हजारे यांनी अनेक विषय उपोषणासाठी मांडले आहेत. परंतु त्याविषयी काही न बोलता त्यांना शुभेच्छा देता. अरे त्यांनी उपोषणच करत बसावे का? अरे काय हा व्यवहार आहे एका ज्येष्ठ समाजसेवकासोबत असा संतप्त सवाल अजित पवार यांनी मोदी सरकारला केला.
राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेतील तिसऱ्या टप्प्याच्या सातव्या दिवसातील पहिली सभा पुण्यातील आंबेगावमधील मंचर येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. अजितदादांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा भाजप सरकारवर जोरदार प्रहार केला. यावेळी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, विलास लांडे, रमेश थोरात, प्रदीप गारटकर, जालिंदर कामटे, रोहित पवार आदींसह मंचर, शिरुर, जुन्नर, खेड, आंबेगाव येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
500 रुपये आले की परत करा आणि भीक देताय का असा जाब विचारा, असे आवाहन शेतक-यांना करून अजित पवार म्हणाले की, आज माझा शेतकरी उध्वस्त झाला आहे. तुमची चेष्टा हे सरकार करत आहे. आमच्या शेतकर्याला 500 रुपये देवून दिवसाला 16 रुपये देताय आणि साधूंना 5 हजार रुपये देतेय. 500 रूपये आले ना की ते सर्व पैसे शेतकऱ्यांनी सरकारला ऑनलाईन परत पाठवा आणि आम्हाला भीक देताय का असा जाब सरकारला विचारा.
दिल्लीमध्ये शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा एकमेव नेता शरद पवार आहेत. परंतु भाजपमध्ये एकतरी असा नेता आहे का असा सवाल अजित पवारांनी केला. ते म्हणाले की, वडिलकीच्या नात्याने पवार साहेब देशातील नेत्यांना सल्ला देत आहेत. सगळ्या पक्षांना एकत्र करण्याचे काम करत आहेत त्यासाठी खासदार निवडून द्या आणि पवार साहेबांचा हात मजबुत करा. आम्ही सत्तेत आल्यानंतर येथील रस्ते दोन वर्षात चांगल्या पद्धतीने करुन देतो हा माझा शब्द आहे त्याशिवाय आंबेगावात पाय ठेवणार नाही. केंद्रात आणि राज्यात सत्ता द्या तुमची सर्व कामे करुन देतो हा अजित पवारांचा शब्द आहे. फक्त घड्याळाचे बटण दाबून सत्ता आणा असे आवाहनही त्यांनी केले.