अरविंद केजरीवाल यांनी तिस-यांदा घेतली दिल्ली मुख्यमंत्रिपदाची शपथ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/unnamed-file-4.jpg)
नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रामलीला मैदानात त्यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांनीही पदाची आणि गोपनियतेची शपथ ग्रहण केली. राज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल मंत्रिमंडळाला शपथ दिली. या सोहळ्यासाठी संपूर्ण दिल्लीला आमंत्रण देण्यात आलंय. यामध्ये डॉक्टर, शिक्षक, बाईक ऍम्बुलन्स रायडर्स, सफाई कर्मचारी, कन्स्ट्रक्शन वर्कर्स, बस मार्सल, ऑटो ड्रायव्हर यांचा समावेशही आहे.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी रामलीला मैदानात या शपथविधी सोहळ्यासाठी जमलेल्या जनतेलाही संबोधित केलं. ते म्हणाले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं. परंतु, दुसऱ्या कार्यक्रमात व्यग्र असल्यानं ते इथं उपस्थित होऊ शकले नाहीत. परंतु, या मंचावरून मी त्यांच्याकडून आशीर्वादाची याचना करतो. दिल्लीतून वेगळ्या राजनीती सुरुवात झालीय, केंद्रासोबत मिळून दिल्लीच्या विकासासाठी काम करायचं आहे, असंही ते म्हणाले.
केजरीवाल यांच्यासहीत सहा मंत्र्यांनी शपथ केली ग्रहण
राजेंद्र गौतम यांनी घेतली पदाची आणि गोपनीयतेची शपथ. गेल्या मंत्रिमंडळातही राजेंद्र गौतम यांचा समावेश होता. जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजनेद्वारे आपचा दलित चेहरा म्हणून त्यांना ओळख मिळाली. आम आदमी पक्षाचा ‘मुस्लीम चेहरा’ असलेल्या इमरान हुसैन यांनी घेतली पदाची आणि गोपनीयतेची शपथ… हुसैन यांचाही मागच्या केजरीवाल मंत्रिमंडळात समावेश होता. जामिया मिलिया विद्यापीठातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलंय. कुटुंबातला कपडे व्यापाराचा व्यवसाय बाजुला ठेवून त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला.