breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

अडीच वर्षांच्या मुलावर दुर्मीळ शस्त्रक्रिया!

बिहारमधील दरभंगा येथून आलेल्या अडीच वर्षांच्या अविनाशच्या हृदयाचा आकार वाढत (कार्डियो मायोपथी) होता. यातून कधीही हृदयक्रिया बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. अविनाशच्या मूत्रपिंडाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. त्याच्या परिणामी रक्तदाब मोठय़ा प्रमाणात वाढून हृदयावर ताण निर्माण होत होता. जे.जे. रुग्णालयाच्या हृदयविकार विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी मूत्रपिंडाच्या रक्त वाहिन्यांमधील अडथळा दूर करण्यासाठी बलून अँजिओप्लास्टी करून त्याचे हृदय पूर्ववत कार्यरत केले. हा आजार जगभरातच दुर्मीळ असून भारतातही हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढय़ाच शस्त्रक्रिया दरवर्षी होतात. तथापि अडीच र्वष एवढय़ा लहान वयातील अँजिओप्लास्टी ही देशातील पहिली शस्त्रक्रिया असल्याचा दावा जे.जे. रुग्णालयातील हृदयविकार विभागातील मानद प्राध्यापक डॉ. अनिल कुमार यांनी केला आहे.

बारा वर्षांच्या आतील लहान मुलांमध्ये रक्तदाबाचा त्रास उद्भवण्याचे प्रमाण कमीच असते. अडीच वर्षांच्या अविनाशला रक्तदाबाचा त्रास असेल हे दरभंगा येथील डॉक्टरांना सुरुवातीला कळलेच नाही. तापावर उपचार करताना काही चाचण्या केल्यानंतर बाळाला हृदयविकाराचा त्रास असल्याचे निदान त्यांनी केले. डॉक्टरांनी या बाळाला उपचारासाठी मुंबईला घेऊन जाण्याचा सल्ला पालकांना दिला. त्यानुसार जूनमध्ये अविनाशला जे.जे. रुग्णालयातील बालरोग विभागात दाखल करण्यात आले. तेथे त्याला हृदयविकाराचा त्रास असल्याचे व बाळाच्या हृदयाचा आकार वाढत असल्याचे आढळून आले. त्यानंतर जुलैअखेरीस या बालकाला हृदयविकार विभागात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉ. अनिल कुमार व डॉ. नागेश वाघमारे यांनी त्याची डॉपलरसह  तपासणी केली असता मूत्रपिंडाला रक्तपुरवठा करणाऱ्या प्रमुख रक्तवाहिन्या बारीक झाल्याचे आढळून आले. यातील गंभीरबाब म्हणजे अशा आजारात प्रामुख्याने कमी रक्तदाब आढळतो. मात्र अविनाशला उच्च रक्तदाबाचा त्रास होता व मूत्रपिंडाला रक्तपुरवठा करणाऱ्या उजव्या रक्तवाहिनीत ९० टक्के ब्लॉक होते तर डाव्या रक्तवाहिनीत ६५ टक्के  ब्लॉक निर्माण झाल्याने रक्तवाहिन्या अरुंद झाल्या होत्या. याच्या परिणामी हृदयाचा आकार वाढू लागला, असे डॉ. नागेश यांनी सांगितले. यानंतर डॉ. अनिल कुमार व डॉ नागेश यांनी शनिवारी अविनाशच्या मूत्रपिंडाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांची बलुन अँजिओप्लास्टी केली. आता बाळ पूर्ण बरे असून येत्या दोन दिवसांत त्याला घरी पाठविण्यात येईल, असे डॉ. अनिल कुमार यांनी सांगितले.  अविनाशचे आई-वडील गरीब असून  शासनाच्या कोणत्याच योजनेत त्यांना सामावून घेऊन मोफत शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते.बाळाची परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. अनिल कुमार यांनी एक रुपयाही न घेता शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला व अमलातही आणला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button