अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/Last-4.jpg)
नवी दिल्ली – माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देताना सगळा देश हळहळला. अंत्यसंस्कारांच्या आधी त्यांचे पार्थिव स्मृती स्थळ या ठिकाणी आणण्यात आले. त्यावेळी त्यांच्या पार्थिवाला लष्कराच्या तिन्ही दलांकडून सलामी देण्यात आली.
तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आणि त्यावर पुष्पचक्र अर्पण केले. अटलजींच्या मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी अटलजींच्या चितेला अग्नी दिला. नमिता भट्टाचार्य यांनी जेव्हा अग्नी दिला तेव्हा सगळेच नेते, उपस्थित हात जोडून उभे राहिले. अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव पंचत्त्वात विलीन झाले. त्यांना अखेरचा निरोप देताना सगळ्यांचेच डोळे भरून आले होते.
वाजपेयी हे ११ जूनपासून रुग्णालयात दाखल होते. त्यांना मधुमेहाने ग्रासले होते आणि त्यांचे एकच मूत्रपिंड कार्यरत होते. गेले नऊ आठवडे त्यांच्यावर ‘एम्स’मध्ये उपचार सुरू होते. गेल्या ३६ तासांत त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली होती. अखेर गुरुवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले.