अखेर गोपीचंद पडळकरांवर बारामतीत गुन्हा दाखल
मुंबई | भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी (२४ जून) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत टोकाची टीका केली. पवारांवर पडळकरांनी केलेल्या या टीकेने राज्यातील राजकारण आता चांगलेच पेटले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता बारामती शहर पोलीस ठाण्यात गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत”, अशी अत्यंत टोकाची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
पडळकर यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनीच तीव्र शब्दात याचा निषेध व्यक्त केला. राज्यभरात विविध ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत अत्यंत आक्रमक पवित्र्यात पडळकरांना इशारा दिला. पडळकरांच्या या विधानानंतर भाजपकडून देखील पडळकरांच्या या विधानाची भाजपकडूनही जबाबदारी घेण्यात आली नाही. उलट त्याबद्दल नाराजीच व्यक्त केली गेली. देवेंद्र फडणवीस यांनी देखील गोपीचंद पडळकरांना याबाबत समज दिली आहे.