अकरावी, बारावीला पर्यावरणशास्त्राची लेखी परीक्षा रद्द
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Exam-69-2.jpg)
मुंबई:- अकरावी आणि बारावीला असलेली पर्यावरणशास्त्र विषयाची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली असून, यानंतर प्रकल्पाच्या आधारे गुण देण्यात येणार आहे.देशभरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अभ्यासक्रमांत पर्यावरण या विषयाचा समावेश करण्यात आला. यंदा पर्यावरण हा विषय ‘पर्यावरणशास्त्र आणि जलसुरक्षा’ असा करण्यात आला आहे.
गेली दोन वर्षे नववी आणि दहावीच्या मूल्यमापन योजनेत बदल केल्यानंतर आता यंदा अकरावी आणि पुढील वर्षांपासून बारावीच्या मूल्यमापन योजनेत बदल केले आहेत. आतापर्यंत अकरावी आणि बारावीला पर्यावरणशास्त्र विषयाची ५० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येत होती. या विषयासाठी ३० गुणांची लेखी परीक्षा आणि २० गुणांचा प्रकल्प असे वर्गीकरण करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा मूल्यांकन प्रणालीत विभागाने बदल केला आहे. त्यानुसार पर्यावरणशास्त्राची लेखी परीक्षा काढून टाकली आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांना प्रकल्प आणि प्रकल्प वही किंवा कार्यशाळेत सहभागी व्हावे लागणार आहे. त्यानुसार प्रकल्पाला ३० गुण असतील आणि कार्यशाळा किंवा प्रकल्प वहीसाठी २० गुण निश्चित करण्यात आले आहेत. यासाठी ‘अ’ ते ‘ड’ यापैकी श्रेणी देण्यात येणार आहेत.