अंबरनाथमध्ये आयफोनचा स्फोट, तरुणाचे दोन्ही पाय भाजले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/iphone-6.jpg)
ठाण्यातील अंबरनाथमध्ये अॅपल कंपनीच्या आयफोन 6 या मोबाइलचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. अंबरनाथच्या कोहोजगाव परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली. यामध्ये अमित भंडारी हा तरुण जखमी झाला आहे.
अंबरनाथ पश्चिम भागातील कोहोजगार येथे राहणारा अमित भंडारी हा गेल्या वर्षभरापासून आयफोन ६ हा फोन वापरत होता. रविवारी रात्री घरी आलेल्या अमितने नेहमीप्रमाणे आपला आयफोन चार्जिंगसाठी लावला होता. यावेळी मोबाइलमध्ये मेसेज वाचत असतानाच अचानक मोबाइलचा स्फोट झाला.
या स्फोटात अमितचे दोन्ही पाय भाजले. स्फोट होताच अमितने मोबाइल हातातून गादीवर फेकला, त्यामुळे कापसाच्या गादीलाही आग लागली. याप्रकरणी आयफोन कंपनीकडे तक्रार करणार असल्याचं अमितनं सांगितलं आहे.
दरम्यान, चार्जिंगला असताना मोबाइलचा स्फोट होण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे शक्यतो मोबाइल चार्जिंगला असताना त्याचा वापर टाळावा आणि मोबाइल हाताळताना खबरदारी घेण्याची गरज आहे.