breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने १ ऑगस्ट २०२३ रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक आणि विश्‍वस्त डॉ. रोहित टिळक यांनी आज पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

१ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची १०३ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणार्‍या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्काराने गौरविले जाईल. यंदा या पुरस्काराचे यंदाचे ४१ वे वर्ष आहे. तसेच या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, ट्रस्टचे विश्‍वस्त सुशीलकुमार शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधानपदी असताना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करावा लागला होता. तर डॉ. मनमोहन सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी यांना ते पंतप्रधान होण्यापूर्वी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

पुरस्काराचे पूर्वीचे मानकरी
ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांना पहिला पुरस्कार प्रदान करून १९८३ मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात झाली. गोदावरी परुळेकर, इंदिरा गांधी (मरणोत्तर), श्रीपाद अमृत डांगे, अच्युतराव पटवर्धन, खान अब्दुल गफार खान (मरणोत्तर), सुधाताई जोशी, मधु लिमये, बाळासाहेब देवरस, पांडुरंगशास्त्री आठवले, शंकर दयाळ शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, टी. एन. शेषन, डॉ. रा. ना. दांडेकर, डॉ. मनमोहन सिंग, डॉ. आर. चिदम्बरम, डॉ. विजय भटकर, राहुल बजाज, प्रा. एम. एस. स्वामिनाथन, डॉ. वर्गीस कुरियन, रामोजी राव, एन. आर. नारायण मूर्ती, सॅम पित्रोदा, जी. माधवन नायर, डॉ. ए. सिवाथानू पिल्लई, मॉन्टेकसिंग अहलुवालिया, प्रणब मुखर्जी, शीला दीक्षित, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे, डॉ. ई. श्रीधरन, डॉ. अविनाश चंदेर, सुबय्या अरुणन, शरद पवार, आचार्य बाळकृष्ण, डॉ. के. सिवन, बाबा कल्याणी, सोनम वांगचूक, डॉ. सायरस पूनावाला आणि डॉ. टेस्सी थॉमस यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button