breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

लोकसभा निवडणूक रणसंग्राम : आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे आणि घोषणाबाजी..!

दिशा सोशल फाउंडेशनचा कार्यक्रम: परखड चर्चेमुळे चिंचवडला रंगला ‘‘मावळचा रणसंग्राम’’

पिंपरी : बारामती लोकसभेत विजय शिवतारे यांनी घेतलेल्या भूमिकेचे मावळ लोकसभेत उमटलेले पडसाद, राष्ट्रवादी आणि भाजपने मावळ  मतदारसंघावर केलेला दावा, विकासाचे दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप, गुगली प्रश्नांना दिलेली सफाईदार उत्तरे आणि एकूणातच खुसखुशीत व परखड चर्चेमुळे मावळ लोकसभेचा रणसंग्राम चांगलाच रंगला. यानिमित्ताने मावळचे प्रलंबित प्रश्न ऐरणीवर आलेच. निवडणुकीचे राजकीय वातावरणही अक्षरशः ढवळून निघाले.

दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाट्यगृहात रविवारी  ‘मावळ लोकसभेचा रणसंग्राम’ या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे, पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे, भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यात सहभागी झाले होते. लेटस अप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी या सर्वांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी सभागृह तुडुंब भरले होते. 

जवळपास दोन तास चाललेल्या या चर्चेदरम्यान उपस्थित नेत्यांनी मावळ मतदारसंघातील विविध प्रश्न तथा समस्यांवर आधारित आपापली भूमिका विस्ताराने मांडली. प्रश्नोत्तराच्या सत्रात मुलाखतकारांनी विचारलेल्या गुगली प्रश्नांना नेत्यांनी सफाईदारपणे उत्तरे दिली. क्षणाक्षणाला होणाऱ्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते. कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. 

केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून मावळ मतदारसंघांमध्ये गेल्या दहा वर्षात झालेल्या विविध विकासकामांची जंत्री खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी सादर केली. अजूनही काही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून काही नियोजनात आहे. हीच विकासकामे घेऊन आगामी निवडणुकीत जनतेसमोर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी भाजपच्या चिन्हावर उभा राहणार नसून शिवसेनेचाच उमेदवार असल्याचा दावाही बारणे यांनी यावेळी केला. 

बारणे म्हणाले, महत्त्वपूर्ण अशा नदीसुधार प्रकल्पास राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. सर्व औद्योगिक पट्यात मलनिस्स:रण प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेशी संबंधित विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. पिंपरी पासपोर्ट कार्यालय सुरू झाले आहे. संरक्षण क्षेत्राविषयक प्रश्नांचा उच्चस्तरीय पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे रेड झोनचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटेल. 

संजोग वाघेरे म्हणाले की, मावळ मतदारसंघाच्या विकासाबाबत केले जाणारे दावे फोल आहेत. विकास कुठेही दिसून येत नाही. हजारो कोटींचा निधी मावळसाठी मिळाला असूनही त्याचा विनियोग झालेला नाही. रायगड जिल्ह्यातील अनेक उद्योजक सुविधा मिळत नसल्याने पळून गेले आहेत. स्थानिकांना नोकऱ्या मिळत नसल्याने युवक निराश आहेत. रेडझोन, पाणी प्रश्न, आरोग्यव्यवस्था, बेरोजगारीसारखे अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. पिंपरी चिंचवड शहराला अद्यापही दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. नद्या प्रचंड अस्वच्छ आहेत. पिंपरी ते निगडी मेट्रोचा विस्तार झाला नाही. हिंजवडी मेट्रो पिंपळे सौदागर मार्गे जाणे अपेक्षित आहे. पुणे लोणावळा लोकल फेऱ्यांमध्ये व्हायला हवी. कासारवाडी, चिंचवड, आकुर्डी रेल्वेस्टेशनचा विकास झाला नाही. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या शहरात थांबल्या पाहिजेत. गडकोट किल्ले व लेण्यांचे संवर्धन झाल्यास स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. कारखान्याचे स्थलांतर थांबले पाहिजे. वाड्या वस्त्यांवर अध्यापही वीज, रस्ते, पाणी नाही. पनवेल मनपा मधील मिळकत धारकांना दुहेरी कर आकारला जातो. आयुक्तांकडून पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वांगीण विकास होतो आहे. शेतकरी, गरीब, कामगार, युवकांच्या कल्याणाचे धोरण राबवण्याचे  काम सरकारकडून सुरू आहे. स्वातंत्र्याचा शतकोत्तर महोत्सव २०४७ मध्ये साजरा करताना, भारत देश महासत्ता होण्यासाठी २०२४ ची निवडणूक पायाभरणी ठरणारी आहे. मावळ मतदारसंघावर भाजपचा  पूर्वीपासूनच दावा आहे. संपूर्ण मतदारसंघात भाजपचा प्रभाव आहे. पिंपरी पालिकेत भाजपची सत्ता आहे. अशा सर्व बाबींचा विचार करता भाजपला मावळ मतदारसंघ मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. मात्र, सरतेशेवटी वरिष्ठ नेते महायुतीचा जो उमेदवार देतील. तो निवडून आणण्याची जबाबदारी शहर भाजपा पूर्ण करेल. 

-शंकर जगताप, शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवड भाजपा. 

पिंपरी-चिंचवड शहर, हिंजवडी आणि लगतच्या परिसरातील उद्योग, व्यवसायाची घडी शरद पवार यांच्यामुळेच बसली. जेएनएनयुआरएमचा भरीव निधी शरद पवारांनी मिळवून दिला. मावळ लोकसभेत आतापर्यंत उध्दव ठाकरे यांचाच पॅटर्न यशस्वी ठरला आहे. ही निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांसह स्थानिक मुद्द्यांवरही लढली जाणार आहे. तळेगाव येथील वेदांत- फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला स्थलांतरित केला. तेव्हा खासदारांनी विरोध करायला हवा होता. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपाने जे काही केले, ते संपूर्ण देशाने पाहिले आहे. सध्या कर्ज काढून अर्थव्यवस्था फुगवण्याचे काम सुरू असल्याचे दिसते.

-सुनील गव्हाणे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरद पवार गट)

मावळ लोकसभा मतदारसंघात काम करण्यास भरपूर वाव आहे, प्रत्यक्षात त्या प्रमाणात तेथे विकासाची कामे होऊ शकलेली नाहीत. येथील नद्यांना गटारांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मोठी गुंतवणूक करणाऱ्या आणि रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या नामांकित कंपन्या गुजरातमध्ये नेण्यात आल्या. असे होत असताना अर्थव्यवस्था कशी वाढणार. याउलट गुन्हेगारी वाढतच राहील. देशाची व राज्याची स्थिती सध्या गंभीर आहे. त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. 

-पृथ्वीराज साठे – सचिव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी.

पिंपरी-चिंचवड शहराचा चेहरामोहरा अजित पवार यांच्यामुळे बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मावळमधून महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादीचा उमेदवार दुसऱ्या स्थानावर होता. अजूनही मावळ लोकसभेचा महायुतीचा अधिकृत उमेदवार जाहीर झालेला नसल्याने आम्ही मतदारसंघावरील दावा सोडलेला नाही. उमेदवारी मिळवण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करणार आहोत. विजय शिवतारे कालपर्यंत शिवसेनेत होते. त्यांच्या काही विधानांमुळे राजकीय वातावरण बिघडले आहे. बारामतीत ते महायुतीचा धर्म पाळणार नसतील तर आम्हाला मावळात वेगळा विचार करावा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसला कोणी कमी लेखू नये, ही आमची भूमिका आहे. शिवतारे यांनी महायुतीतून बाहेर पडून बंडखोरी केल्यास त्याचा इतरत्र परिणाम होणार नाही. महायुतीच्या उमेदवाराच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत.

-अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी आमदार (अजित पवार गट)

 

सुरक्षारक्षक नव्हे; माझे पंजाबमधील कार्यकर्ते… 

आमदार अण्णा बनसोडे यांच्यासमवेत सहा तगडे खाजगी सुरक्षारक्षक होते. त्यांचा वावर पाहून मुलाखतकार योगेश कुटे यांनी बनसोडे यांना प्रश्न केला की, ही सुरक्षाव्यवस्था कशासाठी आहे. तेव्हा बनसोडे यांनी हे सुरक्षारक्षक नसून माझे कार्यकर्तेच आहे, असा दावा केला. सफारी कपड्यात असणारे, बलदंड शरीरयष्टीचे पंजाबी युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाटत नाहीत. जर सत्ताधारी आमदारांना सुरक्षित वाटत नसेल तर सर्वसामान्यांची काय परिस्थिती असेल, असे मुलाखतकार म्हणाले. माझे गाव पंजाबात आहे आणि ते पंजाबमधून आलेले माझे कार्यकर्ते आहेत, असे बनसोडे म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

राजकारणात हे सारे चालते…

राजकारणातील बदलती राजकीय स्थिती या मुद्द्यावर बोलताना श्रीरंग बारणे म्हणाले की, राजकारणात वेळोवेळी स्थित्यंतरे होत असतात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप माझ्या विरोधात होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत ते माझ्या प्रचारात आघाडीवर होते. २०१९ ला पार्थ पवार यांच्या विरोधात मी निवडणूक लढवली. आता २०२४ मध्ये अजित पवार माझ्या प्रचारात येतील. राजकारणात हे सर्व काही चालत असते.  संजोग वाघेरे म्हणाले की, अजित पवार यांनी मला शिवसेनेत पाठवले या चर्चेत काही तथ्य नाही. उद्धव ठाकरे यांनीच मला निरोप देऊन बोलवून घेतले. त्यानुसार मी माझ्या राजकीय प्रवासाची, आतापर्यंतच्या कार्याची माहिती ठाकरे यांना दिली. त्यानंतर, माझा रीतसर शिवसेना प्रवेश झाला. मला आयात उमेदवार म्हणणाऱ्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. 

खडाजंगी, गदारोळ…

पिंपरी चिंचवड शहरातील बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून खासदार श्रीरंग बारणे व मारुती भापकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या दरम्यान दोघांच्याही समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली, त्यामुळे काही काळ गदारोळ झाला. भापकरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, २०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी नरेंद्र मोदी यांनी ४५० सभा घेतल्या  त्यावेळेस त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या ठरल्या. मोदींनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली. भय आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ म्हणाले. प्रत्यक्षात त्याच्या उलट परिस्थिती आज दिसून येते. नोकऱ्यांचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात प्रचंड बेरोजगारी वाढली. झोपडपट्टीवासियांना घरे मिळाली नाहीत. कारखाने नाहीत, रोजगारही नाही. खासदार बारणे यांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. बेकायदा बांधकामासंदर्भात आम्ही सुरू केलेले आंदोलन बारणे यांनी हायजॅक केले. त्या विषयाचे भांडवल करूनच ते खासदार झाले. भापकरांच्या या विधानावरून बराच गदारोळ झाला. भापकर धादांत खोटं बोलतं आहेत, असे सांगून बारणे यांनी त्यांच्या आरोपांचे खंडन केले. एका टेबलवर समोरासमोर बसून प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्याचे आव्हान बारणे यांनी भापकरांना दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button