बांगलादेशशी बिघडलेले संबंध सुधारणार? एस. जयशंकर उद्या ढाका दौऱ्यावर; खालिदा झियांच्या अंत्यसंस्कारांसाठी राहाणार उपस्थित

S Jaishankar : भारत आणि बांगलादेश यांच्यामधील संबंधांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढला आहे. यादरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ३१ डिसेंबर रोजी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’च्या (BNP) अध्यक्षा खालिदा झिया यांच्या शासकीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खलिदा झिया यांचं मंगळवारी सकाळी ६ च्या सुमारास निधन झालं. त्या ८० वर्षांच्या होत्या. बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीनं सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या निधनाचं वृत्त जाहीर केलं.
खालिदा झिया यांचे निधन अशा वेळी झाले आहे, जेव्हा त्यांचे सुपुत्र आणि ‘बीएनपी’ पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रेहमान नुकतेच १७ वर्ष देशाच्या बाहेर राहिल्यानंतर बांगलादेशात परतले आहेत. खलिदा झिया या बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या अध्यक्षा होत्या. रेहमान २५ डिसेंबर रोजी बांगलादेशमध्ये परतल्यानंतर त्यांनी पक्षाचं काम पाहायला सुरुवात केली आहे. आता खलिदा झिया यांच्या निधनानंतर रेहमान हेच पक्षाचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.
सध्या रेहमान पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. अवघ्या दोन महिन्यांत बांगलादेशमध्ये १२ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. त्याआधीच खलिदा झिया यांचं निधन झाल्यामुळे याचा बांगलादेशातील आगामी राजकीय समीकरणांवर नेमका कोणता प्रभाव पडणार, याबाबत राजकीय विश्लेषकांकडून अंदाज लावले जात आहेत.
हेही वाचा – पुणे जिल्हा शिक्षण मंडळ क्रीडामहोत्सवात चार हजार विद्यार्थी खेळाडूंचा सहभाग
गेल्या वर्षी झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर शेख हसीना यांना सत्तेतून खाली खेचण्यात आले. तेव्हापासून भारत-बांगलादेश संबंधांमध्ये मोठा दूरावा आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान दोन्ही देशांमधील सध्याच्या या तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशबरोबर पुन्हा चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
खलिदा झिया या तीन वेळा बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. त्यात १९९१ ते ९६, १९९६ साली काही काळासाठी तर २००१ ते ०६ या काळात त्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळली. खालिदा झिया यांनी त्यांच्या कार्यकाळांमध्ये चीनशी संबंध अधिक घट्ट केले. ज्यामुळे भारताची चिंता वाढली. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात देखील बांगलादेशचा कल चीनकडे अधिक राहिला, यामुळे चीन हा बांगलादेशला लष्करी साहित्याचा पुरवठा करणारा मुख्य देश बनला.
मोहम्मद युनूस यांनी भारताला अंतर दिल्यानंतर बांगलादेशची पाकिस्तान आणि चीन यांच्याशी वाढत असलेली जवळीक भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. झिया यांचे पुत्र रेहमान आगामी बांगलादेश निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा आहेत. या सर्व घडामोडींदरम्यान त्यांनी केलेली विधाने देखील चर्चेत आहे.
मे महिन्यात तारिक रेहमान यांनी लोकांनी निवडून दिलेले सरकार नसताना, दीर्घकालीन परराष्ट्र धोरणाबाबतचे निर्णय घेणार्या युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर ढाका येथील एका सभेत त्यांनी स्पष्ट केले की, बांगलादेश भारत किंवा पाकिस्तान यांपैकी कोणाशीही जास्त जवळीक ठेवणार नाही. “दिल्ली आणि पिंडीही (रावळपिंडी) नाही, आमच्यासाठी सर्वात आधी बांगलादेश,” अशी घोषणा केली.
तकेचन नाही तर रहमा यांनी भारत विरोधी जमात-ए-इस्लामी सारख्या राजकीय ताकदींवरही टीका केली. त्यांनी १९७१ च्या युद्धादरम्यान जमात-ए-इस्लामीने पाकिस्तानला दिलेल्या समर्थनाचा दाखला देत त्यांच्यावर ही टीका केली. जमात-ए-इस्लामी हा पक्ष एकेकाळी बीएनपीचा सहकारी होता.




