पुणे जिल्हा शिक्षण मंडळ क्रीडामहोत्सवात चार हजार विद्यार्थी खेळाडूंचा सहभाग
शिक्षण विश्व : जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धांना रंगत

पिंपरी चिंचवड: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला जिल्हास्तरीय क्रीडामहोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. या क्रीडामहोत्सवात जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील सुमारे चार हजार विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग नोंदवला. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धांमुळे सासवड येथील वाघिरे महाविद्यालयाचे क्रीडांगण जणू क्रीडापंढरीचे रूप धारण केले होते.
संस्थेच्या वाघोली, खानापूर, आकुर्डी, ओझर, पौड, निमगाव केतकी, सुपे, नसरापूर आणि न्हावरे या नऊ गटांमधून कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल यांसारख्या सांघिक क्रीडांसह अॅथलेटिक्स प्रकारातील विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या सर्व शाखांमधील सुमारे पंधरा हजार खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. गटस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले कौशल्य सादर केले.
सासवड येथील वाघिरे महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर दोन दिवस सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धांचा थरार पाहायला मिळाला. खेळाडूंची जिद्द, कौशल्यपूर्ण खेळी, डावपेच आणि सांघिक एकात्मता याचे उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. अनेक स्पर्धांमध्ये अटीतटीचे सामने झाले आणि शेवटच्या क्षणापर्यंत निकालाची उत्कंठा कायम होती.
हेही वाचा – केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची अर्थतज्ज्ञांसोबत बैठक

या क्रीडामहोत्सवाचे आयोजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अड संदीप कदम, खजिनदार अड मोहनराव देशमुख, उपसचिव एल एम पवार, सहसचिव ए एम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. रजिस्ट्रार सिताराम अभंग, अधिक्षक किरण देशपांडे, विशेष कार्यकारी अधिकारी प्रमोद जाधव, अकाऊंटंट गोरख सोंडकर, क्रीडा विभागाचे समन्वयक डॉ योगेश पवार, क्रीडा अधिकारी शाम भोसले, संतोष पठारे, आदिनाथ पाठक यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली. सासवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंडित शेळके, शेठ गोविंद रघुनाथ साबळे फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या राजश्री चव्हाण तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडाशिक्षक, प्राध्यापक आणि सेवकांनी या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
चौदा, सतर, एकोणीस वर्षे वयोगट तसेच महाविद्यालयीन गटात घेण्यात आलेल्या धावणे, उड्या, फेक प्रकार, रिले, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, बुद्धिबळ आणि योगासने या स्पर्धांमध्ये मुला मुलींनी उल्लेखनीय कामगिरी केली. विविध शाळा आणि महाविद्यालयांतील खेळाडूंनी मिळवलेल्या यशामुळे त्यांच्या संस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
हा क्रीडामहोत्सव विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना चालना देणारा, सांघिक भावना वाढवणारा आणि जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ठरला. यशस्वी आयोजनामुळे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या क्रीडाविषयक उपक्रमांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.




