गणपती बाप्पा म्हटल्यानंतर मोरया का म्हणतात? काय आहे कथा?
![Why do you say Morya after saying Ganapati Bappa? What is the story?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/Ganpati-Bappa-Morya-780x470.jpg)
Ganpati Bappa Morya | गणपती बाप्पाचा जयघोष करताना आपण नेहमी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, असे म्हणतो; पण आपण गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ‘मोरया’च का म्हणतो? तुम्ही कधी याबाबत विचार केला आहे का? तुम्हाला कदाचित माहीत नसेल; पण याचा संबंध एका गणेशभक्ताशी जोडला जातो. मोरया गोसावी हे गणेशाचे मोठे भक्त होते. त्यांचे मोरया हे नाव गणपती बाप्पाशी जोडले जाते. पण, एका भक्ताचे नाव बाप्पासह का जोडले गेले असेल? यामागे एक कथा प्रसिद्ध आहे. चला, तर मग आज आपण ती जाणून घेऊ..
मोरया गोसावी हे पुण्यातील प्रसिद्ध देवस्थान आहे. मोरया गोसावी हे मोठे गणेशभक्त असून, त्यांचे मूळ गाव मोरगाव आहे. थेऊर येथे येऊन त्यांनी चिंतामणीची घोर तपश्चर्या केली. त्यांची भक्ती पाहून चिंतामणी प्रसन्न झाले आणि त्यांना अष्टसिद्धी प्राप्त झाल्या, असे सांगितले जाते. त्यानंतर ते थेऊरहून मोरगावला पुन्हा परत गेले. तेथे जाऊन त्यांनी गोरगरीब, दीनदुबळ्यांच्या संकटांचे निवारण केले. जनसेवेमुळे त्यांना ध्यानधारणेला वेळ मिळेनासा झाला म्हणून ते चिंचवडजवळील किवजाई जंगलात वास्तव्यास आले आणि दर महिन्याच्या प्रतिपदेला ते मोरगावला जात असत. चतुर्थीला मोरयाची पूजा करून पंचमीला पारणे करून, ते चिंचवडला परत जात, असा त्यांचा नित्यक्रम सुरू होता. कालांतराने चिंचवडचा पसारा वाढत गेला.
हेही वाचा – राज्यात दोन महिन्यात २ लाख कोटींची गुंतवणूक; ३५ हजार रोजगार निर्मिती
एका प्रसिद्ध कथेनुसार शके १४११ (इ. स. १४८९) मध्ये नेहमीप्रमाणे मोरया गोसावी मोरगावला वारीसाठी गेले होते. तेव्हा मोरगावच्या मयूरेश्वराने मोरयांना दृष्टांत दिला ‘‘आता तू वृद्ध झाला आहेस. वारीस येताना तुझे फार हाल होतात हे मला पाहवत नाही. यापुढे तू वारीला येऊ नकोस. मीच चिंचवडला येतो.’’ दुसऱ्याच दिवशी नदीतील तिसरे स्नान करताना त्यांच्या ओंजळीत शेंदरी रंगाची मूर्ती आली. त्यांनी ती मूर्ती देऊळवाड्यात आणून, तिची प्राणप्रतिष्ठापना केली.”
मोरया गोसावी यांनी मार्गशीर्ष वद्य षष्टी शके १४८३ (इ. स. १५६१)ला समाधी घेतली. त्या समाधीच्या ठिकाणीच म्हणजेच चिंचवड येथे प्रसिद्ध मोरया गोसावी गणपती देवस्थान आज उभे आहे. मोरया गोसावी यांच्या समाधीनंतर त्यांचे पुत्र चिंतामणी यांनी या समाधीवर सिद्धी-बुद्धीसहित मोरयाची मूर्ती स्थापन केली. या देवस्थानाच्या परिसरात देऊळवाडा (मंगलपूर्ती वाडा) आहे आणि तेथेही एक गणेशमूर्तीदेखील आहे.
गणपती बाप्पाच्या नावासह मोरया गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले गेले की, आजही लोक येथे फक्त गणपती बाप्पा, असा उच्चार न करता ‘गणपती बाप्पा मोरया’ असे आवर्जून म्हणतात. पुण्यातील याच गावापासून ‘गणपती बाप्पा मोरया’ असा उच्चार करण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात ‘गणपती बाप्पा मोरया’, असे म्हटले जाते.