“मजेसाठी पुन्हा बॉम्ब टाकू”; इराणच्या सर्वात मोठ्या तेल केंद्रावर हल्ल्याचा ट्रम्प यांचा इशारा

Donald Trump | अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणच्या खार्ग बेटाचे मोठे नुकसान झाले असून पुढील काही दिवसांत आणखी हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी “आम्ही फक्त मनोरंजनासाठीही आणखी काही वेळा हल्ला करू शकतो,” असे विधान केले.
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाला तीन आठवडे होत असताना परिस्थिती अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. इराणची राजधानी तेहरान चर्चा करून संघर्ष संपवण्यास तयार असल्याचे संकेत देत असले तरी “अटी अद्याप पुरेशा चांगल्या नाहीत,” असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : “कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर स्टॉलसकट उखडून टाका”; नितेश राणेंचं मोठं वक्तव्य
दरम्यान, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या शिपिंग मार्गाच्या सुरक्षेबाबतही ट्रम्प यांनी इशारा दिला आहे. या मार्गातून तेल आयात करणाऱ्या देशांनी शिपिंग सुरक्षित ठेवण्यासाठी आपले नौदल पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले. “जगातील अनेक देशांना होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल मिळते. त्या मार्गाची सुरक्षितता राखणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आम्ही मोठी मदत करू,” असे ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिले.
होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एक मानली जाते. पर्शियन आखात आणि ओमानच्या आखाताला जोडणाऱ्या या अरुंद जलमार्गातून जागतिक तेल व वायू पुरवठ्याचा मोठा हिस्सा वाहतूक केला जातो. मात्र, सध्या वाढलेल्या तणावामुळे शिपिंगवरील धोका वाढला असून ऊर्जा किमतीतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



