न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, थेरगाव येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन उत्साहात
शिक्षण विश्व : विज्ञान प्रदर्शनात शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग

पिंपरी-चिंचवड | राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, थेरगाव येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन अत्यंत उत्साहपूर्ण व अभ्यासपूर्वक वातावरणात करण्यात आले. विज्ञान क्षेत्रातील महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव श्री. अशोक मोरे सर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय पवार सर, खजिनदार सौ. सुरेखा पवार मॅडम, मुख्याध्यापिका सौ. विद्या नाईक मॅडम, अग्निस मॅडम तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक केले.
हेही वाचा : अमेरिका-इराण संघर्षाचा शेअर बाजारावर परिणाम; सेन्सेक्स १ हजारांहून अधिक अंकांनी खाली
या विज्ञान प्रदर्शनात शाळेतील प्री-प्रायमरीसह सर्व वर्गांतील विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग होता. विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग, मॉडेल्स व संकल्पना प्रभावीपणे सादर केल्या. पर्यावरण संवर्धन, ऊर्जा बचत, सौरऊर्जा, जलसंधारण, तसेच दैनंदिन जीवनातील विज्ञान या विषयांवरील प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचे कौतूक…
विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे प्रमुख पाहुणे तसेच पालक भारावून गेले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचे आणि कल्पकतेचे कौतुक करताना सांगितले की, “या शाळेतून भविष्यात उच्च दर्जाचे शास्त्रज्ञ घडतील आणि ते शाळेचे तसेच पिंपरी-चिंचवड शहराचे नाव उज्ज्वल करतील.” विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, संशोधनाची आवड आणि आत्मविश्वास वृद्धिंगत झाल्याचे समाधान आयोजकांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.




