अध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडी

बेरोजगारी: एक समांतर विश्व

बेरोजगारी हा शब्द हल्ली फार गाजतोय. पुण्यात एका आयटी कंपनीत ५० जागांसाठी ५००० अर्ज आल्याची बातमी नुकतीच वाचनात आली. हे ऐकून मनात प्रश्न उभा राहिला – एवढी लोकं नोकरीच्या शोधात आहेत, पण त्याचवेळी शहरभर दोन-तीन कोटींचे फ्लॅट्स विकले जातायत, लक्झरी गाड्या घेतल्या जातायत. मग बेरोजगारी आहे की नाही?

दोन वेगवेगळ्या जगांमध्ये जगणारा समाज

आजचं वास्तव असं आहे की, एकीकडे श्रीमंतीची चकाकी, आणि दुसरीकडे बेरोजगारीची झळ. काही लोक बँकेच्या कर्जावर महागडे घरं आणि गाड्या घेतायत, आणि काही जण नोकरीच्या शोधात पायाला भिंगरी लावून फिरतायत.

मध्यंतरी पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या तरुणांची अशीच तुफान गर्दी पाहायला मिळाली होती. एवढी गर्दी, की तिथे लाठीचार्ज आणि अश्रुधूर सोडावा लागला! मग प्रश्न पडतो – हे बेरोजगार आहेत की स्पर्धात्मक युगाच्या सावलीत उभे असलेले हुशार तरुण?

बेरोजगारी असली तरी पैसे कुठून येतात?

जर खरोखरच बेरोजगारी इतकी गंभीर आहे, तर महागड्या सिनेमागृहात हाऊसफुल्ल शो कसे होतात? मोठमोठ्या मॉल्समध्ये खरेदीसाठी गर्दी का असते? क्रिकेट सामने, राजकीय सभा, डिस्को-पबमध्ये लोक इतक्या मोठ्या संख्येने कुठून येतात? लोकांकडे पैसा नाही, हे सत्य असू शकत नाही. पण प्रत्येकाकडे पैसा समान प्रमाणात आहे का?

काही जणांकडे एवढा पैसा आहे की, ते सहजपणे श्रीमंती आयुष्य जगतात. दुसरीकडे, काही तरुण रोजगाराच्या शोधात वणवण फिरत आहेत. कुणाला गरजेपेक्षा जास्त मिळतंय, आणि कुणाला काहीच मिळत नाहीये – हीच खरी समस्या आहे.

हेही वाचा –  १० लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त होणारबजेटमध्ये केंद्र सरकार डबल गिफ्ट देण्याच्या तयारीत

सरकारी नोकरभरती: नोकरीपेक्षा मोठा खेळ?

सरकारी नोकरी हा आजही स्थिर भविष्याचा आधार मानला जातो. पण तिथेही स्पर्धा एवढी वाढली आहे की, दहा जागांसाठी दहा हजार अर्जदार असतात. नोकरभरतीत पारदर्शकता नसेल, तर चांगल्या पात्रता असलेल्या लोकांनाही संधी मिळत नाही. अनेकवेळा निवड प्रक्रियेत राजकीय वशिला, आर्थिक देवाणघेवाण आणि ओळखीचा मोठा खेळ असतो. त्यामुळे बेरोजगारी ही केवळ नोकरी नसल्याची समस्या नाही, तर योग्य संधी न मिळण्याची समस्या आहे.

उद्योग आणि स्टार्टअप्स – एक पर्याय की आणखी एक अडथळा?

तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, अशी हमी सरकार देते, पण प्रत्यक्षात बँकेच्या कर्जासाठी राजकीय ओळख लागते. मुद्रा लोन मिळवण्यासाठी सामान्य माणसाला महिनोन् महिने सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. कर्ज मिळालं, तरी व्यवसाय सुरू करण्यासाठी इतके नियम आहेत की, तो व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो.

शिक्षण आणि रोजगार यांचं तुटलेलं नातं

आपण अजूनही जुन्या पद्धतीच्या शिक्षणावर भर देतो. संकल्पना पाठांतर करून परीक्षेत गुण मिळवणं सोपं, पण प्रत्यक्षात त्या कौशल्याचा उपयोग होत नाही. परिणाम? पदवीधर बेरोजगारांची फौज तयार होते. आज इतर देशांमध्ये शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आवश्यक कौशल्य शिकवलं जातं. आपल्याकडे मात्र हे शिक्षण ‘नोकरीच्या बाजारपेठे’ला अनुरूप नाही.

नवीन युगातील बेरोजगारीची कारणं

1. स्पर्धेचं वाढतं प्रमाण: एका छोट्या नोकरीसाठी हजारोंचे अर्ज येतात.

2. कौशल्यांचं अपयश: शिकलेलं आणि उद्योगात लागणारं यामध्ये मोठी तफावत आहे.

3. औद्योगिक मंदी: काही वर्षांपूर्वी मोठ्या संख्येने आयटी कंपन्यांमध्ये नोकर कपात झाली. स्थिर नोकरीची हमी आता उरलेली नाही.

4. सरकारी योजनांची अपयश: नोकरभरती आणि लघुउद्योगांसाठी असलेल्या योजना पारदर्शक नाहीत.

5. राजकीय हस्तक्षेप: नोकऱ्यांमध्ये राजकीय वशिला मोठा अडथळा ठरतोय.

बेरोजगारी दूर करण्यासाठी काय करता येईल?

✔ शिक्षण आणि कौशल्य विकास: पारंपरिक शिक्षण पद्धती सुधारून प्रत्यक्ष कौशल्याधारित शिक्षण द्यावं.
✔ उद्योगधंद्यांना प्रोत्साहन: लघु आणि मध्यम उद्योगांना अधिक सुलभ पद्धतीने कर्ज द्यावं.
✔ नोकरभरती प्रक्रियेतील पारदर्शकता: राजकीय हस्तक्षेप कमी करून, गुणवत्ता आणि पात्रतेच्या आधारावर नोकऱ्या द्याव्यात.
✔ स्वयंरोजगाराला मदत: स्टार्टअप आणि उद्योजकांसाठी सहज नियमावली लागू करावी.

शेवटचा विचार – “आजचा नोकरदार, उद्याचा बेरोजगार?”

आज ज्यांच्याकडे नोकरी आहे, तेही १००% निश्चिंत नाहीत. कोणताही उद्योग एक झटक्यात कोसळू शकतो. कोरोनाकाळात अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कमी केलं. त्यामुळेच “आज सुरक्षित असलेला उद्या बेरोजगार होऊ शकतो” ही जाणीव लक्षात ठेवायला हवी.

बेरोजगारी हा केवळ आकड्यांचा खेळ नाही. ही समाजाच्या प्रत्येक स्तराला वेगवेगळ्या प्रकारे भिडणारी समस्या आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, नाहीतर उद्या ही परिस्थिती अधिकच गंभीर होईल!

– हर्षल आल्पे

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button