गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तृणमूल काँग्रेस उतरणार
कोलकाता – पुढील वर्षी २०२२ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. याबाबत तृणमूल काँग्रेसने मोठी घोषणा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. कारण गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तृणमूल काँग्रेस उतरणार आहे. तशी घोषणाच काल टीएमसीचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केली.
गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आपले उमेदवार उतरवणार आहे. डेरेक ओ ब्रायन यांनी त्याबाबत शनिवारी घोषणा केली. तृणमूल काँग्रेस लवकरच आपला गोव्यातील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करेल. आम्ही गोव्यातील सत्ताधारी भाजपाचे मोठे प्रतिस्पर्धी आहोत. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वातील पक्षात कोणतीही एकाधिकारशाही नाही. त्या गोव्यात विश्वसनीय स्थानिक नेत्यांना मैदानात रिंगणात उतरवतील अशी माहितीही डेरेक ओ ब्रायन यांनी दिली आहे.




