आंध्रप्रदेशातून पांढरकवडा – यवतमाळ- बाभुळगावमार्गे गांजाची तस्करी ; चांदूर रेल्वेनजीक ४३५ किलो गांजा जप्त
![Trafficking of ganja from Andhra Pradesh via Pandharkavada – Yavatmal – Babhulgaon; Chandur Railway seizes 435 kg of ganja](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/ganja-1.jpg)
अमरावती : यवतमाळ ते चांदूर रेल्वे मार्गावर गांजाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मालखेड येथील उद्यानाजवळ नाकाबंदी करून एका ट्रकमधून ४३५ किलो वजनाचा गांजा जप्त केला. आंध्रप्रदेशातून पांढरकवडा-यवतमाळ-बाभुळगावमार्गे अमरावतीत ट्रकमधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने चांदूर रेल्वे ते अमरावती मार्गावर मालखेड उद्यानाजवळ शनिवारी सकाळी नाकाबंदी केली.
पोलिसांनी एका आयशर ट्रकला अडवून तपासणी केली, तेव्हा त्यांना प्लास्टिकच्या रिकाम्या ‘कॅरेट’ खाली गांजा दडवून ठेवलेला आढळला. या गांजाचे वजन ४३५ किलो असून पोलिसांनी ट्रक आणि दोन दुचाकींसह ७४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या ट्रकच्या पुढे आणि मागे दोन दुचाकी होत्या. दुचाकीवरील लोक ट्रकचालकाला रस्त्यावरील हालचालींची बातमी पुरवत होते, पण मालखेड उद्यानाजवळ ते पोलिसांना गुंगारा देऊ शकले नाही.