To The Point : उद्योजक अमर मुलचंदानी यांना जामीन; पिंपरी विधानसभेच्या राजकारणात ‘ट्विस्ट’
राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांचे पारडे जड : इच्छुक उमेदवारांच्या रणनितीला लागला सुरुंग
![To The Point : Bail for entrepreneur Amar Mulchandani; 'Twist' in Pimpri Vidhan Sabha politics](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Anna-bansode-1-780x470.jpg)
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी विधानसभा मतदार संघातील व्यापारी, उद्योजकांमध्ये मोठे प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरीम जामीन मंजूर केला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुलचंदानी पिंपरी विधानसभा मतदार संघाची राजकीय समीकरणे बदलण्यासाठी ताकदीने कामाला लागणार आहेत. किंबहुना, विद्यमान आमदार आण्णा बनसोडे यांचे पारडे जड होईल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
सुरूवातीला काँग्रेस त्यानंतर भाजपा असा राजकीय प्रवास करणारे अमर मुलचंदानी सेवा विकास सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी दि. १ जुलै २०२३ पासून अटकेत होते. त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
माजी नगरसेवक आणि उपमहापौर म्हणून अमर मुलचंदानी यांनी काम केले आहे. पिंपरी कॅम्पमधील व्यापारी वर्गामध्ये मुलचंदानी एकप्रकारे ‘मसिहा’ म्हणून कार्यरत होते. दि सेवा विकास सहकारी बँक ही व्यापाऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जात होती. मात्र, बँकेतील वर्चस्ववादाच्या लढाईत बँक अनियमिततेच्या संकटात अडकली आणि मुलचंदानी यांच्यावर कारवाई झाली.
दरम्यान, मुलचंदानी विरोधी गटाने आगामी विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवारासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. त्यामुळे संपूर्ण व्यापारी वर्ग आमदार आण्णा बनसोडे यांच्यापासून बाजुला जाईल, असा दावा केला जात होता. तसेच, इच्छुक उमेदवाराच्या तिकीटासाठी काही व्यापाऱ्यांनी ‘फिल्डिंग’ लावल्याचे बोलले जात होते. विशेष म्हणजे, याच व्यापाऱ्यांच्या गटात आणि मुलचंदानी यांच्या संघर्ष आहे.
त्यामुळे ‘शत्रुचा शत्रू आपला मित्र’ या सूत्रानुसार, अमर मुलचंदानी यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर अंतरिम जामीन मिळाला असल्यामुळे आमदार आण्णा बनसोडे यांच्यासाठी काम करतील. किंबहुना, कॅम्पातून बनसोडे यांना मोठी ताकद मिळेल. कारण, शहरातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचा ‘कनेक्ट’ आणि व्यापाऱ्यांमध्ये असलेला जनसंपर्क यामुळे मुलचंदानी बनसोडे यांच्यासाठी ‘सारथी’ म्हणून काम करतील, असा दावा राजकीय जाणकार करतात. मुलचंदानी यांच्या सक्रीयतेमुळे पिंपरीतील राजकीय समीकरणे कशी बदलतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.