“ही आमची खूप मोठी चूक होती,” शुद्धीकरण करत २०० हून अधिक भाजपा कार्यकर्त्यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
!["This was our biggest mistake," more than 200 BJP workers joined the Trinamool Congress](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/BJP-Workers-Joined-TMC.jpg)
पश्चिम बंगाल |
पश्चिम बंगालच्या हुगली जिल्यात जवळपास २०० कार्यकर्त्यांनी भाजपामधून बाहेर पडत पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी गंगाजलने आपलं शुद्धीकरण करुन घेतलं. भाजपामध्ये प्रवेश करणं आपली खूप मोठी चूक होती असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आपल्या या चुकीसाठी त्यांनी मुंडन करुन घेत आणि गंगाजल शिंपडून शुद्धीकरण केलं आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
भाजपा कार्यकर्त्यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाचा झेंडा हाती घेतला आणि स्थानिक खासदारांना पाठिंबा दर्शवला. टीएमसीचे खासदार अपरुपा पोद्दार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी त्यांनी आरामबाग येथे गरीबांना मोफत अन्न पुरवण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी दलित समाजातील काही लोक आले आणि आपण भाजपामध्ये जाऊन खूप मोठी चूक केली असल्याचं म्हटलं. आपल्या चुकीचं प्रायश्चित्त केल्यानंतर ते पुन्हा टीएमसीत येऊ इच्छित होते.
विधानसभा निवडणुकीत टीएमसीला मिळालेल्या यशानंतर अनेक जिल्ह्यांमधील कार्यकर्ते पुन्हा एकदा टीएमसीमध्ये येत आहेत. याआधी बिरभूम येथे ५० हून अधिक भाजपा कार्यकर्त्यांनी टीएमसीच्या कार्यालयाबेह धरणे आंदोलन करत आपल्याला पुन्हा पक्षात घ्यावं अशी मागणी केली होती. यानंतर त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला होता. यावेळी त्यांनी भाजपात प्रवेश केल्याबद्दल खेद व्यक्त केला होता. दरम्यान भाजपाने विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या हिंसाचारामुळे कार्यकर्ते पुन्हा टीएमसीमध्ये जात असल्याचा दावा केला आहे. आपल्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची भीती असल्याने कार्यकर्ते भीतीपोटी प्रवेश करत असून त्यांच्यावर जबरदस्ती केली जात असल्याचं भाजपाने म्हटलं आहे.