सेल्फी काढताना तरुण ६०० फूट दरीत कोसळला; २५ तासांनंतर रेस्क्यु टीमनं वाचवला जीव!
![The young man fell 600 feet into a ravine while taking a selfie; Rescue team saves life after 25 hours!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/satara-kaas-selfie-accident-1.png)
सातारा |
सेल्फी काढण्याचा नाद अनेकदा जिवावर बेतल्याची अनेक प्रकरणं आजवर कानांवर आली आहेत. काही दिवसांपूर्वीच मावळमध्ये १० वर्षांच्या मुलाचा सेल्फी काढताना पाय घसरून तो पाण्यात पडल्यामुळे त्याला वाचवताना त्याचे वडील आणि मामाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मावळमध्ये घडली होती. पुन्हा एकदा सेल्फीमुळे एका तरुणाला तब्बल २५ तास मृत्यूशी संघर्ष करावा लागल्याची घटना साताऱ्यातील प्रसिद्ध कास पठाराजवळ घडली आहे. सुदैवाने या तरुणाच्या संघर्षाचा अंतिम परिणाम त्याचा जीव वाचण्यात झाला आणि त्याला वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला! कास पठार परिसरात असलेल्या यवतेश्वर जवळच्या गणेशखिंडीत हा प्रकार घडला.
- नेमकं झालं काय?
साताऱ्याच्या यादोगोपाळ परिसरात राहणारा २२ वर्षीय कनिष्क सचिन जांगळे गुरुवारी संध्याकाळी कास पठारावर फिरण्यासाठी गेला होता. पण आज शुक्रवारी सकाळपर्यंत देखील तो परत न आल्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली होती. गणेशखिंड परिसरातील मंदिराजवळ त्याची मोटारसायकल सापडल्यामुळे कुटुंबियांना संशय आला. त्यांनी अजून पुढे जाऊन पाहिल्यानंतर दरीत सुमारे ६०० फुटांवर कुणीतरी पडल्याचं दिसून आलं. सारा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पावलं उचलली आणि शिवेंद्रसिंह राजे रेस्क्यु टीमला पाचारण केलं.
- सेल्फी काढायला उभा राहिला, पण…
दुपारपासून रेस्क्यु टीमने खोल पडलेल्या कनिष्कला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी टीममधील एक तरुण खोल दरीत उतरला. तो कनिष्कपर्यंत पोहोचला तेव्हा कनिष्क जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. क्रेनच्या सहाय्याने कनिष्कला वर खेचण्यात आलं. तो शुद्धीवर आल्यानंतर सगळा प्रकार समोर स्पष्ट झाला. दरीच्या टोकावर उभं राहून सेल्फी काढाताना कनिष्कचा पाय घसरला आणि तो दरीत थेट ६०० फूट खोलपर्यंत जाऊन पडला.
गुरुवारी संध्याकाळी साधारणपणे ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास बचावकार्य सुरू करण्यात आलं. या रेस्क्यु टीमला कनिष्कला बाहेर काढण्यासाठी संध्याकाळचे ७ वाजले होते. त्यामुळे जवळपास २५ तास मृत्यूशीच लढा सुरू असलेल्या कनिष्कला बाहेर काढण्यात अखेर यश आलं. बाहेर काढताच पोलिसांनी कनिष्कला रुग्णालयात दाखल केलं.