युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याचा कोणताही हेतू नाही – व्हाईट हाऊस
![The White House has no plans to send troops to Ukraine](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/AP_22049732812623.jpg)
वॉशिंग्टन | रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनच्या पाठिशी उभे राहिलेल्या अमेरिकेने प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्यावर मात्र बघ्याची भूमिका घेतली होती. परंतु अमेरिकन नागरिकांनीच ‘व्हाईट हाऊस’बाहेर आंदोलन करून आपल्या देशाच्या या भूमिकेचा निषेध केल्यानंतर काही दिवसांपूर्वी अमेरिकेने रशियावर विविध निर्बंध घालून त्यांचे तेल, गॅस आयात करण्यावर बंदी आणून रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु असे असले तरी ‘रशियाविरुद्ध युद्ध लढण्यासाठी युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठवण्याचा अमेरिकेचा कोणताही हेतू नाही’, असे आता व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले आहे.
त्या म्हणाल्या, ‘आमचे लक्ष विश्व युद्ध कसे रोखायचे यावर आहे.’ तसेच ‘युनायटेड स्टेट्सच्या अध्यक्षांचा असा विश्वास आहे की, तेल कंपन्यांकडे युनायटेड स्टेट्समध्ये अधिक तेल आयात करण्यासाठी आवश्यक उपकरणे आणि क्षमता आहे’, असेही त्यांनी म्हटले.
महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेकडून युक्रेनमध्ये सैन्य पाठविण्यात येणार नसले, तरी युक्रेनला आर्थिक मदत सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गेल्या आठवड्यात युक्रेनची मदत १० अब्ज डॉलर्स वाढविण्याची विनंती केली होती. त्यानंतर युक्रेनच्या मदतीसाठी अमेरिकेतील डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन सदस्य एकत्र आले. दोन्ही पक्षांनी युक्रेनला मदत मान्य केली. त्यानंतर आता अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘युक्रेनसाठी लष्करी, मानवतावादी आणि आर्थिक मदतीचे पॅकेज १२ अब्ज डॉलर्सवरून १४ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविण्यात आले आहे. आम्ही युक्रेनला दडपशाही आणि हिंसाचाराविरोधात पाठिंबा देणार आहोत, असे बायडेन व्हाईट हाऊसमध्ये म्हणाले.