देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू, पंतप्रधान मात्र भव्य सभांमध्ये व्यस्त
![The third wave of corona starts in the country, but the Prime Minister is busy with grand meetings](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/IMG-20220103-WA0043.jpg)
नवी दिल्ली | देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने मध्य प्रदेशातील भाजपचे मुख्यमंत्री शिवराजसिंह हे कोरोनाची तिसरी लाट आल्याची घोषणा करत लोकांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशमध्ये भव्य जाहीर सभा घेताना दिसत आहेत. त्यामुळे अनेकांनी भाजपच्या या दुटप्पी वागण्यावर टीका केली आहे.
पुढील काही महिन्यात देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात अनेक कार्यक्रम आयोजित केल्याचे पाहायला मिळाले आहे. काल रविवारी तर मेरठमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात लोकांची प्रचंड गर्दी दिसून आली. त्याठिकाणी कोरोना नियमांचे बिलकुल पालन केले गेले नव्हते. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश ही दोन्ही राज्ये एकमेकाचे शेजारी आहेत. पण मोदींसह अन्य राजकीय पक्षांचे नेतेही उत्तर प्रदेशात मोठमोठ्या सभा घेत आहेत. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात रात्री संचारबंदी आणि दिवसा गर्दीच्या सभांचा धुमधडाका असे चित्र दिसत आहे. पंजाब आणि अन्य राज्यातही अशा सभा घेतल्या जात आहेत.