देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ४० हजारांखाली
![The number of new corona victims in the country is below 40,000](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/corona-5174671_1920-1-8.jpg)
नवी दिल्ली – कोरोनाशी लढण्यासाठी सध्या मास्क वापरणे, वारंवार हात धुवणे, गर्दीत जाणे टाळणे यासह लसीकरण करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वच देश आपापल्या नागरिकांना लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे आवाहन करत आहेत. कारण कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. भारतात काल दिवसभरात ३९ हजार ७० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ४९१ कोरोनाबाधितांनी आपले प्राण गमावले. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ३ कोटी १९ लाख ३४ हजार ४५५ वर पोहोचली आहे, त्यापैकी ४ लाख २७ हजार ८६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
काल दिवसभरात ४३ हजार ९१० जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने देशात आतापर्यंत ३ कोटी १० लाख ९९ हजार ७७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवली असून दैनंदिन प्रमाणही वाढत असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत देशात लसीच्या ४९ लाख ५५ हजार १३८ मात्रा देण्यात आल्या.