रशियाच्या Sputnik V लसींची पहिली खेप आज भारतात दाखल होणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/sputnik-v.png)
नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जातेय. त्यातच लसीकरणालाही ब्रेक लागला आहे. आजपासून देशभरात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरूवात झाली आहे. मात्र, लसींच्या तुटवड्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली आहेत तर काही ठिकाणी मर्यादित स्वरुपात लसीकरण सुरू आहे. लसीचा हा तुटवडा भरून काढण्यासाठी आता देशात रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचा साठा भारतात येणार आहे. स्पुटनिक वी लसीची पहिली खेप आज भारतात दाखल होणार असून जवळपास अडीच लाख डोस आज प्राप्त होणार असल्याचं सांगण्यात येतंय.
Sputnik V चे आज अडीच लाख डोस पाठवण्यात येत आहेत तर या महिन्याच्या शेवटीपर्यंत 30 लाख डोस पोहोचवण्यात येतील असंही रशियाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. रशियातील भारतीय राजदूत बाला व्यंकटेश वर्मा यांनी सांगितलं की, रशियन लस Sputnik V चा भारतातील लसीकरणाच्या कार्यक्रमात लवकरच वापर करण्यात येईल. Sputnik V च्या वापराला भारतात 12 एप्रिलला परवानगी देण्यात आली होती.
कोरोनाव्हायरसच्या संसर्गाविरूद्ध रशियन Sputnik V लस वापरण्यास अधिकृत मान्यता देणारा भारत जगातील 60 वा देश ठरला आहे. जगातील एकूण लोकसंख्येच्या, काही अब्ज किंवा 40 टक्के लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये आता या लसीच्या वापरास मंजुरी मिळाली आहे.
रशियाची कोरोना लस Sputnik V कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या तुलनेत जास्त परिणामकारक असल्याचा दावा केला जातोय. रशियाच्या गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूटने दावा केलाय की Sputnik V लस ही 91.6 टक्के प्रभावी आहे. कोविशिल्ड ही 80 टक्के तर कोवॅक्सिन ही 81 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात येतंय. भारतात सध्या या दोन लसींचा वापर कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये केला जातोय. या दोन लसींचे महिन्याला सात कोटी डोसचे उत्पादन करण्यात येतंय. Sputnik V लस आल्यानंतर या लसींवरची निर्भरता कमी होईल असंही सांगण्यात येतंय.