तिच्या घरावरील पाण्याच्या टाकीत आढळला रत्नदीप कॉलनी येथे उच्चशिक्षित युवतीचा मृतदेह
![The dead body of a highly educated girl was found in the water tank of her house in Ratnadeep Colony](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/bbeb4fec-20f1-4e8e-9cc5-436c1a167acb-780x470.jpeg)
अमरावती शहरातील अर्जुन नगर परिसरातील रत्नदीप कॉलनी येथे उच्चशिक्षित युवतीचा मृतदेह तिच्या घरावरील पाण्याच्या टाकीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. अश्विनी गुणवंत खांडेकर असे मृत युवतीचे नाव आहे. ही युवती गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होती.
मृत अश्विनी खांडेकर (२५) बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या भावाने ३० नोव्हेंबरला रात्री सव्वा दहा वाजेच्या दरम्यान पोलिसांत दिली होती. अश्विनीचा शोध गेल्या तीन दिवसांपासून तिच्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिक घेत होते. दरम्यान शनिवारी दुपारी तिचा मृतदेह तिच्या घरावरील पाण्याच्या टाकीत आढळून आला.
अश्विनी खांडेकर ही अभियंता होती. तिचे वडील गुणवंत खांडकेर हे शिक्षक होते. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांचा मृत्यू झाला. अश्विनी ही आई आणि भावासह रत्नदीप कॉलनी येथील घरात रहात होती. आज दुपारी अश्विनीचे मामा नळाच्या पाण्याने तोंड धुत असताना त्यांना पाण्यातून दुर्गंध आल्याने त्यांनी घरावरची पाण्याची टाकी तपासली असता त्यामध्ये अश्विनीचा मृतदेह आढळून आला. यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. गाडगे नगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्रभारी पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे गाडगे नगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आसाराम चोरमुले यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा रत्नदीप कॉलनी परिसरात पोहोचला. श्वान पथक देखील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन तासानंतर मृतदेह पाण्याच्या टाकीतून काढून तो शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. उच्चशिक्षित असणाऱ्या अश्विनीचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत गुढ कायम असून पोलीस या संपूर्ण प्रकाराचा तपास करीत आहेत.