‘शिवरायांनी राज्यासाठी सक्तीची करवसुली केली’; स्वामी गोविंददेव गिरी महाराज

Swami Govinddev Giri Maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यावर विरोधकांकडून परखड शब्दांत टीका केली जात आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना छत्रपती शिवरायांनी खंडणी मागितली होती, असे विधान केले. यावर वाद-प्रतिवाद सुरू असतानाच आता स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी वेगळेच विधान करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.
स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, संपूर्ण राज्य हिंदूंचे आहे, असे मानून छत्रपती शिवाजी महाराज कार्य करत होते. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेदरम्यान जेव्हा महाराजांना आर्थिक चणचण भासत असे आणि अशावेळी कुठलाही उपाय दिसत नसे. तेव्हा आज ज्याप्रकारे ईडी सक्तीची वसुली करते. त्याचप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी काही लोकांकडून सक्तीची वसुली केली. हिंदवी स्वराज्यासाठी जो कर भरायला हवा होता, त्याची महाराजांनी सक्तीची वसुली केली.
हेही वाचा – मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचा विक्रम! गेल्या २ वर्षं २ महिन्यात ३२१ कोटींहून अर्थसहाय्य वितरित
अमूक एक परिवर्तन आणण्यासाठी एखाद्या महापुरुषाला स्वतःचे जीवन अर्पावे लागते. आज देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने एक आदर्श व्यक्ती लाभले. आज राम मंदिरात केवळ एका मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली नाही, तर या देशाची अस्मिता, स्वाभिमान आणि आत्मविश्वासाची पुन्हा प्रतिष्ठापना झाली आहे. ५०० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हे स्वप्न पूर्ण होत आहे, असंही स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले.





