सूर्यमालेच्या सखोल अभ्यासासाठी ‘नासा’च्या ‘ल्युसी’ यानाचे यशस्वी प्रक्षेपण
![Successful launch of NASA's Lucy spacecraft for in-depth study of the solar system](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/Lucy-NASA-2048x1300-1.jpg)
वॉशिंग्टन – ‘नासा’ने आता सूर्यमालेच्या सखोल अभ्यासासाठी एका नव्या मोहिमेला सुरुवात केली असून १ हजार ५०० किलो वजनी ६ मीटर लांबीच्या २ सोलर पॅनलसह ‘ल्युसी’ या यानाचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. ‘टलस-५’ या प्रक्षेपकाच्या सहाय्याने अमेरिकेतील फ्लोरिडा येथील तळावरून आज रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ‘ल्युसी’ अंतराळात झेपावले. हे यान पुढील १२ वर्षे प्रवास करणार असून गुरू ग्रहाच्या कक्षेतील ८ लघुग्रहांची छायाचित्रे घेणार आहे. गुरुच्या लघुग्रहांचा अभ्यास नासाकडून केला जाणार आहे.
गुरू ग्रहाच्या कक्षेत लघुग्रहांचे दोन मोठे समूह हे मागे आणि पुढे असे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. या लघुग्रहांना गुरू ग्रहाचे ट्रोजन म्हटले जाते. हे लघुग्रह सूर्यमालेच्या निर्मितीपासून अस्तित्त्वात आहेत, असा खगोलतज्ज्ञांचा अंदाज आहे. नासाच्या या मोहिमेमुळे सूर्यमालेच्या निर्मितीबद्दल मोलाची नवी माहिती मिळेल, अशी अपेक्षा शास्त्रज्ञांना आहे. गुरूचे ट्रोजन म्हणून ओळखल्या जाणार्या या लघुग्रहांची संख्या अडीच लाखांपेक्षा अधिक आहे. १ किलोमीटरपासून ते १०० किलोमीटरपर्यंत या लघुग्रहांचे व्यास आहेत. यातील ८ मोठ्या लघुग्रहांचा अभ्यास ‘ल्युसी’ यान करणार आहे.