हैदराबादमध्ये तुफान पाऊस! दोघे नाल्यात वाहून गेले
![Storm rains in Hyderabad! Both were swept away in the nala](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/download-4-1.jpg)
हैदराबाद- तेलंगाणाची राजधानी हैदराबादमध्ये काल मध्यरात्री कोसळलेल्या तुफान पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे हैदराबादमधील काही रस्त्यांवरही अक्षरशः गुडघ्यापर्यंत पाणी साचले. अशा परिस्थितीत दोन लोक नाल्यातही वाहून गेली. हैदराबादच्या ओल्ड सिटीतील एका रेस्टॉरंटमध्ये पावसाचे पाणी घुसले. तसेच रेस्टॉरंटजवळील अनेक घरांमध्ये ही पाणी शिरले.
हैदराबादसह वनस्थलीपुरमच्या अनेक भागांना पावसाने झोडपले. यानंतर रस्त्यावरील परिस्थिती इतकी वाईट होती की, लोकांना रस्ता ओलांडणे देखील कठीण जात होते. तेथील सर्वत्र वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. वाहने रस्त्याच्या मधोमध थांबली होती आणि काही हॉटेल्स आणि घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. एसीपी के. पुरुषोत्तम यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे नाले ओसंडून वाहू लागल्यानंतर दोन व्यक्ती वाहून गेल्या आहेत. बचाव पथक त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पुढील 24 तासांत हैदराबादसह तेलंगणाच्या अनेक जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हैदराबादच्या हवामान खात्याने म्हटले आहे.