सोलापुरातील पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान
पावसामुळे देगाव ओढ्याला नदीचे स्वरूप, पाच तासांत होत्याचं नव्हतं

सोलापूर : सोलापूर शहरात गुरुवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे देगाव ओढ्याला पूर आला आहे. या पुराचे पाणी डोणगाव- तेलगाव रस्त्यावरून वाहू लागले आहे. यावेळी दोन दुचाकीस्वारांनी वाहत्या पाण्यातून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाण्याच्या प्रवाहामुळे दोन दुचाकी वाहने वाहून गेली.
सोलापूर शहरात पडलेल्या पावसामुळे देगाव ओढ्याला नदीचे स्वरूप आले आहे. या ओढ्याचे पाणी बेलाटी, कवठे, डोणगाव मार्गे सीना नदीला मिळते. बुधवारी रात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी हा ओढा दुथडी भरून वाहू लागला. डोणगावाजवळ ओढ्याचे पाणी तेलगाव रस्त्यावरून वाहू लागले आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
या वाहत्या पाण्यातून दुचाकी नेण्याचे धाडस काहीजण करत होते. यामध्ये दोन दुचाकी वाहने वाहून गेली. दुचाकी वाहून जात असताना त्या पकडण्याचा प्रयत्न दुचाकीस्वारांनी केला, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे दोन्ही गाड्या वाहून गेल्या. हे दुचाकीस्वार विंचूर येथील असल्याचे सांगितले जात आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात झाली नव्हती.
पिकांचं मोठं नुकसान
सोलापूर जिल्ह्यातील १३ महसूल मंडळात गुरुवारी रात्री २ ते सकाळी ७ पर्यंत मुसळधार पाऊस झाला. अवघ्या पाच तासात या पावसाने होत्याचे नव्हते केले. खरिपांच्या पिकांची शेतात असलेली ऱ्हास या पावसामुळे मातीमोल झाल्याने या पावसाने शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आणले आहे. वागदरी, शेळगी, वळसंग, होटगी, अक्कलकोट, चपळगाव आणि किणी या सात महसूल मंडळात अवघ्या पाच तासात १०० मिली मीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. राज्यात फेब्रुवारी ते ऑगस्ट 7 महिन्यात शेतकर्यांचे 19 लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे. पण अद्याप एकाही शेतकर्याला मदत मिळालेली नाही