ताज्या घडामोडीविदर्भ

सोलापुरात शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

शेतात केमिकल युक्त पाणी सोडल्याने जमीन नापीक

सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील शेतकऱ्याने शहरातील राहत्या घरी पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्कलकोट रोडवरील कल्पना नगरात रविवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. बसवराज रेवणसिद्ध हिरोळे (४७) असे शेतकऱ्याचे नाव आहे. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र नातेवाईकांनी गंभीर आरोप केले असून शेत जमिनीत बाजूच्या साखर कारखान्याने शेतात केमिकल युक्त पाणी सोडल्याने जमीन नापीक होत आहे. त्यामुळे बसवराज हिरोळे यांनी आत्महत्या केली आहे.

जोपर्यंत नुकसानभरपाई मिळत नाही किंवा साखर कारखाना मालकावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका माध्यमांद्वारे आकाश हिरोळे यांनी मांडली आहे. शासकीय रुग्णालयात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मयत बसवराज हिरोळे हा शेतकरी मूळ धोत्री येथील रहिवासी आहे. सोलापूर शहरातील कल्पना नगरात तो आपल्या कुटुंबीयांसोबत राहण्यास होता. त्यांची पत्नी सविता रविवारी दुपारी शेजारच्या घरात जाऊन बसली होती. इकडे पतीने घरातील छताच्या पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

दरम्यान, त्याची पत्नी दुपारी ४ च्या सुमारास घरी आली. तेव्हा पतीने गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. लागलीच भावाला आणि मुलाला त्याची कल्पना दिली. त्यानंतर मुलगा रविकांत हिरोळे आणि आकाश हिरोळे यांनी वडील शेतकऱ्यास नातेवाइकांच्या साहाय्याने उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयत बसवराज यांच्या मुलाने सांगितले की, त्यांची शेती धोत्री येथे एका साखर कारखान्याच्या शेजारी आहे. कारखान्यातील रसायनयुक्त पाणी शेतात आल्याने शेतामध्ये कोणतेच पीक येत नाही.

याबाबत नुकसान भरपाईसाठी बसवराज हिरोळे कारखान्याकडे अनेकवेळा चकरा मारूनही कोणी दाद घेतली नाही. अखेर आपल्या वडिलांनी आत्महत्या केल्याचा आरोप आकाश हिरोळे यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button