अरुणाचलच्या कामेंगला हिमवादळाचा तडाखा; लष्कराचे ७ जवान अडकले
![Snowstorm hits Kameng in Arunachal; 7 Army personnel trapped](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/n356947968164423285.jpg)
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. येथील अतिउंचीवर असलेल्या हिमस्खलनात भारतीय लष्कराचे ७ जवान अडकले असल्याचे वृत्त समोर आले असून, ही घटना रविवारी घडली असल्याने हिमस्खलनाचा तडाखा बसलेल्या लष्कराच्या गस्तीला वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याचे भारतीय लष्कराने सांगितले आहे.
बचाव कार्यात मदत करण्यासाठी विशेष पथके विमानातून पाठवण्यात आली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात जोरदार बर्फवृष्टीसह खराब हवामानाची नोंद केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, मनाली-लेह महामार्गावर हिमस्खलन झाल्याची बातमी आहे. यानंतर सुट्टीवर गेलेल्या पर्यटकांना विशेषतः सावध राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील चार राष्ट्रीय महामार्गांसह ७३१ हून अधिक रस्ते बंद करण्यात आले आहेत. रस्त्यावर साचलेल्या बर्फामुळे सर्वत्र गाड्या अडकल्या आहेत. हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद झाल्याचे वृत्त आहे.
वीज आणि पाणीपुरवठाही ठप्प झाला आहे. याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. हिमाचल प्रदेशच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितलेल्या माहितीनुसार, राज्यातील १०२ पाणी पुरवठा योजना विस्कळीत झाल्या आहेत. तसेच १३६५ वीज पुरवठा योजना देखील प्रभावित झाल्या आहेत. हिमाचल-उत्तराखंडपासून ते दिल्ली आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालपर्यंत अशाच हवामानाचा फटका बसत आहे. ऐन थंडीत पावसामुळे वातावरणात गारवा देखील वाढला आहे. दुसरीकडे अशीच स्थिती आणखी एक-दोन दिवस राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.