‘बीएसएफ’च्या गोळीबारात तस्कर ठार
![Smuggler killed in BSF firing](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/SHUTTERSTOCK_GUNSHOT_GUN_FIRING.jpg)
- अमली पदार्थांच्या तस्करीचा पाकिस्तानचा प्रयत्न
जम्मू-काश्मीर |
जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरून अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करी करण्याचा प्रयत्न उधळून लावल्याचा दावा सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) बुधवारी केला. या कारवाईत पाकिस्तानमधील एका तस्कराला ठार करण्यात आल्याचेही बीएसएफने म्हटले आहे. या कारवाईनंतर सीमा सुरक्षा दलाने परिसरात शोधमोहीम हाती घेतली आणि हेरॉइनचा २७ किलो साठा जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत १३५ कोटी रुपये इतकी आहे. याबाबत भारताकडे ठोस पुरावे असून पाकिस्तानच्या लष्कराकडे त्याबाबत तीव्र निषेध नोंदविण्यात येणार असल्याचे बीएसएफचे महानिरीक्षक (जम्मू) एन. एस. जमवाल यांनी सांगितले.
कथुआमधील सीमेवरून अमली पदार्थांची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती, आमचे जवान मोक्याच्या ठिकाणी दबा धरून बसले होते, पहाटेच्या सुमाराला संशयास्पद हालचाली दिसल्या, तस्कर सीमेजवळ आले होते, जवानांनी त्यांना इशारा दिला, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यानंतर जवानांनी गोळीबार केला त्यामध्ये एक तस्कर ठार झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी शोधमोहीम सुरू करण्यात आली तेव्हा या तस्कराचा मृतदेह आणि त्याच्याकडील २७ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले.