व्यावसायिक वाहनांमध्ये सेन्सर, अपघात टाळण्यासाठी गडकरींचा प्लॅन
![BJP manifesto will be presented by Union Minister Nitin Gadkari in Goa today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Nitin-Gadkari-PTI.jpg)
नवी दिल्ली – देशात अनेकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. यामध्ये चालकांच्या चुकांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. हे टाळण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मेगा प्लॅन आखला आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी गडकरी काही महत्वाचे निर्णय घेणार आहेत. तसे संकेत त्यांनी दिले आहेत. युरोपियन मापदंडानुसार, व्यावसायिक वाहनांमध्ये सेन्सर लावणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याबाबत ट्विट करून त्यांनी माहिती दिली आहे.
वैमानिकांसाठी विमान उड्डाणाचे तास ठरलेले असतात. त्याचप्रमाणे ट्रक चालकांसाठी वाहतुकीचे तास निश्चित असायला पाहिजे. चालक थकल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. तास निश्चित असेल तर हा अपघात टाळता येईल. जिल्हा रस्ते समितीच्या बैठका नियमितपणे व्हाव्यात यासाठी मी मुख्यमंत्र्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे लिहिणार असल्याचेही गडकरींनी सांगितले. तसेच व्यावसायिक वाहनांमध्ये सेन्सर लावण्याच्या धोरणावर काम करण्याची सूचना देखील अधिकाऱ्यांना दिली आहे. परिणामी चालकाला झोप येत असेल तर या सेन्सरमुळे त्याला जाग येईल, असंही त्यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे.
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषदेची बैठक २१ सप्टेंबरला घेण्यात आली. यावेळी दर दोन महिन्यांनी बैठक घेऊन त्यांचे अपडेट शेअर करण्याचे निर्देश गडकरींनी परिषदेला दिले आहेत.