भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार दिलीप गांधींचे निधन
अहमदनगर – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते. दिलीप गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते.दिलीप गांधी यांचा कोरोना रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आला होता. काल दुपारपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
दिलीप गांधी हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार होते. सुरुवातीला नगरसेवक म्हणून अहमदनगर महानगरपालिकेत त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांतर त्यांची पालिका नेता म्हणून निवड झाली. 1985 मध्ये ते अहमदनगर महानगरपालिकेचे उपाध्यक्ष झाले. भाजपच्या अहमदनगर जिल्हा संघटनेत सरचिटणीस, सहसचिव आणि अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
दिलीप गांधी हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळा खासदार होते. 1999 मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले. 2009, 2014 ला देखील ते पुन्हा निवडून आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते.