SBI, LIC येस बँकेला तारणार?

भांडवलाची चणचण असलेल्या खासगी क्षेत्रातील येस बँकेचे संपादन सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अन्य सहयोगी वित्तीय संस्थांच्या संघाकडून केले जाण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. केंद्र सरकारने या प्रस्तावाला हिरवा कंदीलही दिला असून, लवकरच या संबंधाने अधिकृतपणे घोषणा केली जाणे अपेक्षित आहे. स्टेट बँक आणि सहयोगी संस्थांचे येस बँकेत नियंत्रण हक्क मिळविण्याइतपत भागभांडवली संपादनाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी दिली गेली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सध्या या खासगी बँकेत ८.०६ टक्के भागभांडवल असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीही स्टेट बँकेच्या नेतृत्वातील सहयोगी संघात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, नियमाप्रमाणे आवश्यक खुलासा स्टेट बँक अथवा येस बँक दोघांपैकी कोणाहीकडून अद्याप शेअर बाजारांकडे करण्यात आलेला नाही. ‘गरज भासेल तेव्हा ‘सेबी’च्या नियमाप्रमाणे संलग्न घडामोडींचा खुलासा केला जाईल’ अशी प्रतिक्रिया मात्र स्टेट बँकेकडून देण्यात आलीये. येस बँकेकडूनही गुरुवारी लगोलग खुलासा करण्यात आला. तिच्याकडे रिझव्र्ह बँक अथवा अन्य कोणत्याही सरकारी अथवा नियामक यंत्रणेकडून तसेच स्टेट बँकेकडून कोणत्याही प्रकारे संपर्क अथवा पत्रव्यवहार झालेला नाही, असे शेअर बाजारांना सांगण्यात आलं आहे…





