मातृभूमी अन् देशवासीयांसाठी बलिदान हे आपले कर्तव्य : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
![Sacrifice for motherland and countrymen is our duty: President Draupadi Murmu](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/President-Dropadi-murmu.jpeg)
नवी दिल्ली : आपल्या देशाच्या अनेक आशा – आकांक्षा आपल्या मुलींवर अवलंबून आहेत. पूर्ण संधी मिळाली तर त्या भव्य यश मिळवू शकतात. आपल्या मुली लढाऊ वैमानिक ते अवकाश वैज्ञानिक बनण्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपली विजयपताका फडकावत आहेत, अशा भावना देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केल्या.
India’s new-found confidence stems from the spirit of its youth, its farmers, and above all, its women. pic.twitter.com/enrOpGXI8b
— President of India (@rashtrapatibhvn) August 14, 2022
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशावासीयांना संबोधित केले. आपल्या पर्यावरणासमोर नव नवी आव्हाने येत आहेत, तेव्हा आपल्याला भारताच्या सौंदर्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीचं दृढतेनें संरक्षण केलं पाहिजे. जल, माती आणि जैव विविधतेचं संरक्षण हे आपल्या भावी पिढ्यांप्रती आपलं कर्तव्य आहे. जगात आर्थिक संकट असूनही, भारताच्या अर्थव्यवस्थेला वेगानं पुढे नेण्याचं श्रेय सरकार आणि धोरणकर्त्यांचे आहे. देशाचा आर्थिक विकास अधिकाधिक समावेशक होत आहे आणि प्रादेशिक विषमता कमी होत आहे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.
राष्ट्रपती म्हणाल्या की, आपल्या राष्ट्रीय मूल्यांना नागरिकांची मूलभूत कर्तव्ये म्हणून भारताच्या राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलं आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकाने आपल्या मुलभूत कर्तव्यांची माहिती घ्यावी, त्यांचं पालन करावं,ज्यामुळे आपलं राष्ट्र नव्या उंचीवर पोहोचू शकेल. जेव्हा जग कोरोनाच्या या गंभीर संकटाच्या आर्थिक परिणामांशी लढत होतं तेव्हा भारतानं स्वतःला सांभाळलं आणि पुन्हा अतिशय वेगानं पुढे जाऊ लागला आहे. सध्या भारत जगात सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. २०४७ ह्या वर्षापर्यंत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्णपणे साकार करण्याचा संकल्प आपण केला आहे. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी आपण आधीपासूनच तत्पर आहोत. हा एक असा भारत असेल, ज्याने आपल्या क्षमता प्रत्यक्षात आणल्या असतील. कोरोना महामारीचा सामना करण्यात आपली कामगिरी जगातल्या अनेक विकसित देशांपेक्षाही मोठी आहे. आज देशाच्या कानाकोपऱ्यातआपला तिरंगा अतिशय दिमाखात फडकतो आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या आदर्शांप्रती इतक्या व्यापक स्तरावर लोकांमध्ये जागृती झाल्याचं पाहून आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना अतिशय आनंद झाला असता. शेतकरी आणि आदिवासी समुदायांच्या वीरांचं योगदान दीर्घकाळपर्यंत स्वातंत्र्यलढ्याच्या सामूहिक स्मृतींपासून बाहेरच राहिलं होतं. आपले आदिवासी महानायक केवळ स्थानिक – प्रादेशिक गौरवाचेच प्रतीक नाहीत तर ते संपूर्ण देशासाठी प्रेरणास्त्रोत आहेत, अशा भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केल्या.