धार्मिक कार्यक्रम : ‘चैतन्यस्पर्श’ सोहळ्याला भाविकांचा उदंड प्रतिसाद
![Religious program: 'Chaitanyasparsh' Sohalya Bhavikancha's great response](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Lahu-Balkavkar-780x470.jpg)
- लहू बालवडकर सोशल वेलफेअरचा लक्षवेधी कार्यक्रम
- महिला, पुरुष भजन स्पर्धेचे नागरिकांकडून होतंय कौतुक
पुणे : सुसंस्कृत पुण्याचा लोकप्रतिनिधी कसा असावा याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लहू बालवडकर. बाणेर, औंध,बालेवाडी, सुस, महाळुंगे भागात सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे हे युवा नेतृत्व. सामाजिक कार्यामध्ये सर्वात पुढे असणारे लहू बालवडकर हे अध्यामिक क्षेत्रात देखील चांगलेच सक्रीय असतात. नुकतेच लहू बालवडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लहू बालवडकर सोशल वेलफेअरकडून “चैतन्यस्पर्श” या अलौकिक सोहळ्याचे तसेच भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
चैतन्यस्पर्श या सोहळ्याच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील हजारो भाविकांनी भारतातील १३ शक्तीपीठांमधील संत आणि देवतांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला. अतिशय भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला. अंदाजे १८ ते २० हजार भाविकांनी यावेळी या अद्भुत सोहळ्याला हजेरी लावली तसेच जवळ पास पंधरा हजार भक्तीनी महाप्रसादाचा लाभ घेतला. 8 तास चाललेल्या या सोहळ्यानंतर संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास महाआरती झाली यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. या सोहळ्याच्या निमित्ताने अवघा बालेवाडी परिसर भक्तिरसात नाहून निघाला. या सोहळ्याचे हे तिसरे वर्ष होते.
“चैतन्यस्पर्श” सोहळा नेमका काय आहे?
“चैतन्यस्पर्श” हा भारतातील १३ शक्तीपीठांचा अद्भुत सोहळा असतो.दत्त महाराज संत ज्ञानेश्वर,स्वामी समर्थ,श्री नृसिंह सरस्वती,साई बाबा,गजानन महाराज,मच्छिंद्रनाथ महाराज,समर्थ रामदास स्वामी,टेंबे स्वामी महाराज,श्री शंकर महाराज, श्रीपाद स्वामी, गगनगिरी महाराज आदी संत मंडळी आणि देवतांच्या पादुकांचे यात एकत्र दर्शन घेता येते. यावेळी महाप्रसाद आणि एका महाआरतीचे देखील आयोजन करण्यात येते. यावेळी हजारो भाविक या सोहळ्यात दर्शन घेण्यासाठी येतात.
महिला व पुरूष भजन स्पर्धेला ही लाभला उत्तम प्रतिसाद.
लहू बालवडकर सोशल वेलफेअरकडून महिला व पुरूष भव्य भजन स्पर्धेचे बाणेर बालेवाडी येथे आयोजन करण्यात आले होते. सुरूवातीच्या तीन दिवस या स्पर्धेची प्राथमिक फेरी मोठ्या उत्साहात पार पडली. त्यानंतर या प्राथमिक फेरीतून निवड झालेल्यांची महाअंतिम फेरी “चैतन्य स्पर्श” या कार्यक्रमात पार पडली. यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस “ताजुबाई” भजनी मंडळ,ताजे,मावळ आणि संगीतज्योती महिला भजनी मंडळ,हिंजवडी यांना देण्यात आले. यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस “श्री.गणेश बाळ” भजनी मंडळ भोर आणि संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ,शेटेवाडी तळेगाव दाभाडे यांना देण्यात आले, तर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस “श्री.हरी” भजनी मंडळ पिरंगुट आणि स्वरांजली भजनी मंडळ,मारुंजी यांना देण्यात आले .या स्पर्धेच्या परीक्षणाचे काम सुप्रसिध्द तबला वादक डॉ. राजेंद्र दुरकर आणि सुप्रसिध्द संगीतकार अंगत गायकवाड यांनी पाहिले.
या महिला व पुरूष भव्य भजन स्पर्धेवेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील,आमदार महेश लांडगे, दादा वेदकजी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे मोहनबुबा रामदासी,किर्तनकार संतोष महाराज पायगुडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत सर्व स्पर्धकांचा उत्साह वाढवला आणि लहू बालवडकर यांचे कौतुक केले. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्या देशात अनंत काळापासून नांदत आलेल्या संस्कृतीतून व्यक्त होणार्या ग्रामीण जीवनातील प्रतिमा, जनमाणसात रुजलेले लोकाचार आणि लोकरुढी याला रंजकतेने नटवित ही लोकसंस्कृती उभी राहते.
पुढे बोलताना ते म्हणाले, एकप्रकारे लोकजीवनाचे भावविश्व त्यात प्रतिबिंबित होते. भजन संस्कृती त्यातीलच एक भाग. या संस्कृतीचे आजही ग्रामीण भागात जतन आणि संवर्धनाचे सातत्याने काम होते. या संस्कृतीशी शहरी भागातील अनेकजण बांधिल आहेत. माझ्या कोथरूड मतदारसंघातील भाजपा नेते लहुजी बालवडकर यांनी या संस्कृतीचा लाभ व्हावा, यासाठी महिला पुरुष भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. आज या स्पर्धेस उपस्थिती राहून भजन सेवेचा आस्वाद घेतला. या स्पर्धेत हरिनामाच्या जयघोषात तल्लीन झालो.असं म्हणत त्यांनी बालवडकर यांचे कौतुक केले. दरम्यान, या सोहळ्याच्या निमित्ताने हजेरी लावणाऱ्या सर्व भाविकांचे लहू बालवडकर आभार मानले.