पुढील आठवडय़ात वेगवान लसीकरण; १२ ते १४ वयोगटांतील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणार
![Rapid vaccination next week; The number of vaccination centers for 12 to 14 year olds will be increased](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/NMRT-2.jpg)
नवी मुंबई | नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १२ ते १४ वयोगटांतील लसीकरणास १६ मार्चपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी ५६ तर दुसऱ्या दिवशी ४० मुलांना लसीकरण करण्यात आले. या आठवडय़ात फक्त शहरातील वाशी, नेरुळ, ऐरोली या पालिकेच्या रुग्णालयांत लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. परंतु आता पुढील आठवडय़ात पालिकेच्या ३ रुग्णालयांबरोबरच २३ नागरी आरोग्य केंद्रांत व शाळांमध्येही या वयोगटातील लसीकरण करण्याचे नियोजन पालिकेने केले असून इतर वयोगटातील लसीकरणाप्रमाणे १२ ते १४ वयोगटांतील मुलामुलींचेही वेगवान लसीकरण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.१६ मार्चपासून सुरू झालेल्या लसीकरणाला पालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला आहे. परंतु शहरातील केंद्र वाढवल्यानंतर वेगवान लसीकरण करता येणार आहे. पहिल्या दिवशी कोविन पोर्टलचा गोंधळ होता. परंतु पालिकेने दुसऱ्याच दिवसापासून सर्व वयोगटांतील लसीकरणाप्रमाणे १२ ते १४ वयोगटातील लसीकरणही सकाळी ९ ते ५ वेळात सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेची आता पुढील आठवडय़ात जास्तीत जास्त केंद्रे वाढवण्यात येणार आहेत.
नवी मुंबई महापालिकेने सुरुवातीपासूनच लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य नियोजन केल्यामुळे १८ वर्षांवरील वयाच्या लसीकरणाचे पहिल्या व दुसऱ्या डोसचे १०० टक्के उद्दिष्ट गाठणारी नवी मुंबई महानगरपालिकाही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. १५ ते १८ वयोगटातील लसीकरणातही पालिकेने पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे या वयोगटातील लसीकरण करण्यासाठी पालिकेने नियोजन केले आहे.
पहिल्याच दिवशी पालिकेला १७ हजार कोर्बेवॅक्स लस प्राप्त झाली आहे. १५ ते १८ वयोगटातील पहिल्या डोसचे लसीकरण १०० टक्के पूर्ण करण्यासाठी शाळेमध्ये सुरू केलेल्या केंद्राचा फायदा झाला होता. त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक पाहून शाळांमध्येही १२ ते १४ वयोगटातील लसीकरण केंद्र सुरू करण्याचे पालिकेने नियोजन केले आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ात १२ ते १४ वयोगटातील लसीकरण केंद्रात वाढ केली जाणार आहे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १५ ते १८ या वयोगटांतील मुलांचे लसीकरण ३ जानेवारी २०२२ पासून सुरू करण्यात आले असून १२ ते १४ वयोगटातील लसीकरणाचाही श्रीगणेशा बुधवारपासून झाला आहे. त्याचप्रमाणे ६० वर्षांवरील सर्वानाच बुधवारपासून वर्धक मात्रा देण्यास सुरुवात झाली. ६० वर्षांवरील नागरिकांसाठी वर्धक मात्रा देण्यासाठीची सहव्याधीची अट त्वरित रद्द करण्यात आल्याने ६० वर्षांवरील सर्वानाच वर्धक मात्रा मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाही फायदा ज्येष्ठ नागरिक घेत आहेत.
नवी मुंबईत पुढील आठवडय़ात १२ ते १४ वयोगटांतील लसीकरण केंद्रे वाढवण्यात येणार आहेत. पालिकेच्या रुग्णालयाबरोबरच २३ नागरी आरोग्य केंद्रे व शाळांमध्येही लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे नियोजन आहे. या वयोगटातील लसमात्राही अधिक प्राप्त करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे