सहा वर्षीय मुलीची बलात्कार करुन हत्या, आरोपींचं एन्काऊंटर करणार; मंत्र्याची भरसभेत ग्वाही
![Rape and murder of six-year-old girl, will encounter the accused; Testimony of the Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/reddy.jpeg)
हैदराबाद |
तेलंगाणातील हैदराबादच्या सैदाबाद भागात ९ सप्टेंबर रोजी ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील फरार आरोपीला अटक करून त्याचं एन्काऊंटर करण्यात येईल. आरोपीला सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असं तेलंगणाचे कामगार मंत्री मल्ला रेड्डी म्हणाले. या प्रकरणातील पीडितेला लवकरात लवकर न्याय देण्यात येईल. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांना भेटून त्यांना अतिरिक्त भरपाई देण्यात येईल आणि इतरही शक्य मदत केली जाईल, असंही रेड्डी म्हणाले.
ही घटना हैदराबादच्या सैदाबादमध्ये गुरुवारी, ९ सप्टेंबर रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय आरोपी राजू हा पीडितेचा शेजारी होता. त्याने मुलीशी मैत्री केली होती. मुलगी घरातून बेपत्ता झाल्याच्या काही तासांनंतर आरोपीच्या घरात मृत अवस्थेत आढळली. तेव्हापासून, पोलिसांनी तयार केलेल्या तब्बल नऊ विशेष टीम फरार आरोपीचा शोध घेत आहेत. हैदराबाद पोलिसांनी त्या व्यक्तीचा फोटो आणि इतर माहिती जाहीर केली आहे. जेणेकरून कोणालाही दिसल्यास त्याला ओळखणं सोपं होईल. आरोपी ३० वर्षांचा असून ५.९ फूट उंच आहे. त्याचे लांब केस त्याने बांधले असून तो डोक्यावर लाल रंगाचा स्कार्फ बांधून टोपी घालून आहे. तसेच त्याने साधा शर्ट आणि पँट घातली आहे.
- आरोपीबद्दल माहिती देणाऱ्याला १० लाखांचं बक्षिस…
बुधवारी जारी केलेल्या निवेदनात हैदराबादचे पोलीस आयुक्त अंजनी कुमार म्हणाले की, पोलिसांचे आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप त्याला पकडण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे या आरोपीची ओळख पटवून त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचं बक्षिस देण्यात येईल.