उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहा:कार, ८ जणांचा मृत्यू
![Rain kills 8 in Uttarakhand](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/Uttarakhand.jpg)
नैनीताल – देशातील अनेक राज्यांना सोमवारी अतिवृष्टीने तडाखा दिला. एकीकडे केरळमध्ये सध्या मुसळधार पाऊस आणि पुराचे थैमान सुरू आहे, तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे उत्तराखंड पुन्हा एकदा उध्वस्त झाले आहे. ठिकठिकाणी भुस्खलनामुळे ८ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मिळलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी संवाद साधून राज्यातील मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.
उत्तराखंडमध्ये रामनगरमधील कोसी नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ झाल्यामुळे अनेक रिसॉर्ट्समध्ये पाणी भरले आहे. तर नैनीताल जिल्ह्यातील रामगढमध्ये ढगफुटीमुळे अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांची संख्या अद्याप कळू शकलेली नाही. तर नैनीताल तलावही ओव्हरफ्लो झाल्याने नैनीतालचे रस्ते जलमय झाले आहेत. इमारती आणि घरांमध्येही पाणी साचल्याचे दिसून येत आहे. परिसरात सतत मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच डोंगरावर पडणाऱ्या सततच्या पावसामुळे गंगा नदी 294 मीटरच्या धोक्याच्या चिन्हापासून 0.35 मीटर वर म्हणजेच 294.35 मीटरवर वाहत आहे. गंगेच्या वाढत्या पातळीमुळे हरिद्वारमधील गंगेला लागून असलेल्या भागांना सतर्क करण्यात आले आहे.
दरम्यान, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील विभक्त ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बद्रीनाथ यात्रा थांबवण्यात आली असून बद्रीनाथकडे जाणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात आले आहे.