उत्तर भारतावर पावसाचे ढग; हवामान विभागाचा अंदाज
![Crisis of unseasonal rains now with cold waves](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/rains-e1643603009103.jpg)
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील वातावरणात पुन्हा बदल होत आहेत. सध्या उत्तर भारतात किमान तापमानात वाढ होत असली तरी सोसाट्याचा वारा वाहत आहे. तसेच काही ठिकाणी पावसानेदेखील हजेरी लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा थंडी वाढली असल्याचे चित्र दिसत आहे. हवामान विभागाने दिल्ली-एनसीआरसह बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविला आहे. याठिकाणी २५ आणि २६ फेब्रुवारीदरम्यान हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी येथील तापमान २७ डिग्रीपासून १२ डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरू शकते. तसेच हवामान विभागाने याठिकाणी २६ तारखेसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
राजस्थानमध्ये २४ फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता आहे. यावेळी याठिकाणी वाऱ्याचा वेग २० ते ३० किलोमीटरपर्यंत असेल. तर राज्याच्या पश्चिम भागात ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या हवेत धूलीकणांचाही समावेश असेल. त्याचबरोबर बिहारमध्ये पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहील आणि येथील कमाल तापमान २६ डिग्री सेल्सिअस इतके असेल, तर किमान तापमान १४ डिग्री सेल्सिअसवर घसरेल. तसेच पंजाबचे तापमान अगदी सामान्य असेल, मात्र २६ फेब्रुवारीला राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे.
तर दुसरीकडे, डोंगराळ भागात बर्फवृष्टी सुरूच आहे. हिमाचल प्रदेशच्या वरील भागात हिमवर्षाव आणि मैदानी भागात थोड्या थोड्या विश्रांतीने पाऊस कोसळत आहे. तसेच हवामान विभागाने चंबा, लाहौल स्पीति, कुल्लू, किन्नौर, मंडी, कांगडा आणि शिमला या भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टीचा अंदाज वर्तविला असून यलो अलर्ट जारी केला आहे.
त्याचबरोबर जम्मू-काश्मीरबाबत बोलायचे झाल्यास, सोमवारी रात्री उशिरा याठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर इथे आणि उत्तराखंडमध्ये आजही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. उत्तराखंडच्या अनेक भागांत आणखी तीन-चार दिवस पावसाचा मुक्काम असेल, असाही अंदाज आहे.