गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध
![Protests against images of Gulabrao Patil, Abdul Sattar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/nsk01-780x470.jpg)
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अश्लाघ्य शब्दांत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मंगळवारी रात्री धरणगाव येथे त्यांच्या प्रतीकात्मक प्रतिमांना जोडे मारत निषेध नोंदविण्यात आला.
रात्री छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पालकमंत्री पाटील व कृषिमंत्री सत्तार यांच्या प्रतीकात्मक प्रतिमांना जोडे मारत आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर धरणगाव येथील पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील व मंत्री सत्तार शेख यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसर दणाणला होता. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, जिल्हा उपप्रमुख अॅड. शरद माळी, जिल्हा परिषदेचे सदस्य जानकीराम पाटील, पंचायत समितीचे सभापती दीपक सोनवणे, रमेश पाटील, राजेंद्र ठाकरे, योगेश वाघ, भागवत चौधरी, धीरेंद्र पुरभे, संतोष सोनवणे, विनोद रोकडे, गणेश माळी, जयेश महाजन, भाऊसाहेब सोनवणे, रवींद्र जाधव, राहुल रोकडे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांसह पदाधिकारी उपस्थित होते.